पुणे । सायलीची उंची ही शरिराने कमी असली तरी तिचे कार्य आणि कर्तृत्व पाहिल्यावर हिमालयाकडे पाहताना जशी मान उंचच करावी लागते तसे सायलीच्या वाटचालीकडे पाहून होते. ही डाऊन सिंड्रोममुळे विशेष मुलांमध्ये गणली जाते पंरतू ती केवळ विशेष नव्हे तर ती अतिविशेषच आहे. तिला वाढवताना तीच्या आई-वडिलांनी तसेच तिच्या धाकट्या बहिणीने घेतलेली विशेष मेहनत कौतुकापलीकडची आहे. असे प्रतिपादन जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी केले.सायली अगावणे या विशेष मुलीच्या जीवनावर आधारीत अमेझिंग चाईल्ड सायली एक सत्यकथा या पुस्तकाचे प्रकाशनज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर बुकगंगा डॉट कॉमचे संचालक मंदार जोगळेकर,कॉन्टिनेंटल प्रकाशनच्या संचालिका देवयानी अभ्यंकर कुलकर्णी, ज्या गुणी मुलीवर ही सत्यकथा बेतलेली आहे ती सायली अगावणे, सायलीचे वडील नंदकिशोर आणि आई मनिषा अगावणे उपस्थित होते.
तंत्रज्ञानामुळे माणसे तोडली जात आहेत
वाचन संस्कृतीवर भाष्य करताना गोखले म्हणाले की, वाचनसंस्कृती टिकण्यासाठी प्रकाशक टिकला, जगला पाहिजे. मानवी मनाचा अभ्यास करायचा असेल तर वाचनाशिवाय पर्याय नाही. आजच्या डिजीटल युगात तंत्रज्ञानामुळे माणसे जोडली नव्हे, तर तोडली जात आहेत. हे पुस्तक अनेक संस्था आणि व्यक्तिंपर्यंत पोहचावे यासाठी आपण कटीबद्ध असल्याचे देखील गोखले यांनी यावेळी नमूद केले.
सायलीचा प्रवास भारावून टाकणारा
सायलीच्या आई मनीषा आगवणे यांनी हे पुस्तक लिहिले असून पुस्तकामागची प्रेरणा विशद करताना त्यांना अश्रू अनावर झाले. आपल्या विशेष मुलीला वाढवताना आलेल्या अडचणींवर मात करत नृत्य, चित्रकला, अभिनय यांसह बहरत गेलेला सायलीच्या जीवनाचा वेल शब्दांपलीकडील अमेझिंग कर्तृत्वाचा प्रवास सगळ्यांनाच भारावून टाकणारा होता.
माधव वझे यांची प्रस्तावना
कार्यक्रमाच्या प्रारंभी सायलीने तिचे नृत्य कौशल्य दाखविले. तसेच तिच्या आजवरच्या आयुष्यावर आधारीत ध्वनी चित्रफित दाखविण्यात आली. श्यामच्या आई मधील श्याम ही भूमिका अजरामर करणारे माधव वझे यांनी या पुस्तकाची प्रस्तावना लिहीली आहे. या पुस्तकाचे शब्दांकन शशीकला उपाध्येय यांनी केले आहे. जुईली अगावणे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
हा पालकांसाठी वस्तुपाठच
ज्यांच्या घरात सायलीसारख्या डाऊन सिंड्रोमने ग्रस्त मुले जन्माला आली आहेत. त्या आपल्या विशेष मुलांना नक्की कसे वाढवले पाहिजे त्याचा हा त्या घरातील पालकांसाठी वस्तुपाठच आहे. सायलीच्या आई-वडिलांनी सायली हेच आपले विश्व मानले असून त्यांनी त्यांचे आयुष्य तिच्यावर उधळुन टाकले आहे. असे गोखले यावेळी म्हणाले