सारंगखेडा ता. शहादा येथील तापी नदीवरील पुलाला पडलेल्या भगदाडामुळे पुल अचानक प्रसिद्धीच्या प्रकाश झोतात आला.

शहादा (प्रा. डी. सी. पाटील) ता. 21: सारंगखेडा ता. शहादा येथील तापी नदीवरील पुलाला पडलेल्या भगदाडामुळे पुल अचानक प्रसिद्धीच्या प्रकाश झोतात आला. याला निसर्ग कमी पण बांधकाम विभागाचे संबंधित अधिकारी आणि निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराचे योगदान अधिक आहे. या पुलाच्या इतिहासाचा मागोवा घेतला असता सदरच्या पुलाचे उद्घाटन तत्कालीन मुंबई राज्याचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्या हस्ते करण्यात आले होते. या पुलाची मुदत संपली असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पर्यायी पुलाची व्यवस्था न करता वरिष्ठांना अंधारात ठेवून नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचे धारिष्ट्य करण्यासह वारंवार दुरुस्तीच्या नावाखाली मलिदा खाणाऱ्या अधिकाऱ्यांवर प्रशासन कारवाई करणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.

 

*मोजक्या स्प्रिंग पुलांपैकी एक…

देशात मोजक्या ठिकाणी असणाऱ्या स्प्रिंग पुलापैकी सारंगखेडा येथील तापी नदीवरील पुल आहे. या पुलाचा मागोवा घेतला असता इतिहासातील अनेक घटना अधोरेखित झाल्या आहेत. देशाच्या स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्र व गुजरातचे संयुक्त मुंबई राज्य असताना 1952च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दोंडाईच्याचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार स्व. दादासाहेब रावल यांची प्रचार सभा झाली होती. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री स्व. मोरारजीभाई देसाई यांनी शहादा भागातील नागरिकांना धुळे येथे जिल्ह्याच्या कामांसाठी ये-जा करणेच्या दृष्टीने अडचणीचे ठरणाऱ्या सारंगखेडा येथील तापी नदीवर पुल तयार करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार सन 1952ला या स्प्रिंग पुलाच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली. त्यावेळी सारंगखेडा व टाकरखेडा या दोन्ही बाजूच्या कामावर देखरेख करण्यासाठी स्थानिक दोन निरीक्षकांची (सुपरव्हायझर) नियुक्ती संबंधित ठेकेदार संस्थेने केली होती. त्या दोघांच्या देखरेखीखाली भरावाचे काम झाले होते. सन 1956ला या पुलाचे उद्घाटन मुख्यमंत्री स्व. देसाई यांच्या हस्ते करण्यात येवून पुल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. त्यामुळे शहादा, धडगाव, अक्कलकुवा व तळोदा भागातील नागरिकांची दोन टप्प्यातील प्रवासाची समस्या सुटली होती.

 

धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांना जोडणारा सोनगीर ते धडगाव राज्यमार्ग क्र. एक हा महत्वाचा राज्यमार्ग आहे. तो राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे 2019ला वर्ग झाला आहे. परंतु राष्ट्रीय महामार्गाच्या लायकीचे कुठलेही काम या मार्गावर झालेले नाही. या महामार्गावरील दोंडाईचा ते टाकरखेडा या सेक्शनच्या रस्त्याचे काम माजी मंत्री आ. जयकुमार रावल यांच्या जागरूकते मुळे वेळोवेळी झाले असल्याने तेथपर्यंतचा रस्ता सुयोग्य आहे. मात्र, सारंगखेडा ते शहादा या सेक्शनच्या रस्त्याची मागील तीन वर्षातली अवस्था तर चाळणी सारखी झाली असल्याने वारंवार आंदोलने झालीत. आश्वासन आणि किरकोळ डागडुजी व्यतिरिक्त ठोस असे काम अद्याप करण्यात आले नाही. त्यामुळे निकृष्ठ दर्जाच्या डागडुजी नंतर तीन महिन्यात रस्त्यावरील खड्डे जैसेथे होतात. त्यामुळे हा रस्ता मलिदा खाण्याचे कुरुण असल्याची भावना ठेवूनच कामे केली जात असल्याचा आरोप नेहमीच होत आला आहे.

 

शहादा ते सारंगखेडा या राष्ट्रीय महामार्गाच्या या रस्त्याने लोकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यात भर आणि दुष्काळात तेरावा महिना म्हणजे आता या रस्त्याच्या तापी नदीवरील टाकरखेडा भागाकडील पुलाचा भराव व पिचिंगला भगदाड पडल्याने खचले आहे. तर पुल व नदीकाठ यास जोडणारा टाकरखेडा कडील भराव खचला आहे. त्यामुळे वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आली आहे. नदीच्या अलिकडचा भाग शिंदखेडा तालुक्यात येतो. पलिकडचा भाग शहादे तालुक्यात येतो. त्यामुळे दोन्ही कडील यंत्रणांना यात लक्ष घालावे लागत आहे. दोन वर्षांपूर्वीच या पुलाच्या स्प्रिंगचे काम करण्यात आले होते. अनेक वर्षांपूर्वी बांधलेल्या या पुलाची मुदत संपली आहे असेही सांगण्यात येते. परंतु आजही मुळ पुलाचा भाग व्यवस्थित आहे. फक्त काठावरील पुल व रस्ता यातील जोड भराव खचला आहे. आताच्या या घटनेत नदी पात्रालगतचे पिचिंगही वाहून गेले आहे. वास्तविक पिचिंग व भरावाचे हे काम दोन वर्षापूर्वीच झालेले होते. परंतू हातनुर धरणातून सर्वच्या सर्व ४३ दरवाजे उघडल्याने तापी पात्रात पुराचा प्रचंड विसर्ग सुरु आहे. हे निमित्त धरून चूक झाकण्यासाठी पुरामुळे हा प्रकार झाल्याचे शासकीय कारण सांगितले जात आहे. ज्यावेळी या भराव पिचिंगचे इस्टिमेट केले होते तेव्हा हातनुर धरणाचे सर्व दरवाजे उघडल्यावर पाण्याचा प्रवाह कुठपर्यंत कुठल्या लेव्हल पर्यंत जाईल याचा विचार तेव्हाच्या अभियंत्यांनी केला नव्हता काय या प्रश्नाचेही उत्तर शोधले तर अनेक अधिकारी व ठेकेदारावर कारवाई होवू शकते. कारण त्यांच्या एका चुकीमुळे आज हजारो नागरिक – विद्यार्थी यांना मोठा फेरा घेत प्रवास करावा लागत आहे. नदीचा पुर प्रवाह ओसरल्यानंतरच भरावाच्या पिचिंगचे काम सुरू होईल. अभियंत्यांच्या चुकीचा एवढा मोठा फटका नागरिकांना अकारण बसणार आहे.

 

*पर्यायी पुलाचे नियोजन का नाही…

आता प्रश्न असा निर्माण झाला आहे की, तापी नदीवरील या सारंगखेडा पुलाची मुदतच जर संपली असेल तर त्या आधीच पर्यायी नवीन पुलाच्या निर्मितीचे नियोजन का करण्यात आले नाही. आधी सार्वजनिक बांधकाम विभाग व अलिकडे राष्ट्रीय महामार्ग विभाग काय करीत होते. शहादा व दोंडाईचा भागात तर एकाहून एक आमदारांनी व खासदारांनी प्रतिनिधीत्व केले आहे. इतकी वर्ष त्यांनी काय केले असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. शासकीय खुलासा सांगतो की मुख्य पुलास काहीही धोका झालेला नाही. धुळे व नंदुरबारच्या जिल्हाधिकार्‍यांच्या समन्वयाने काम सुरु आहे. लवकरच काम पूर्ण केले जाईल. तूर्त वाहतूक सुरक्षित मार्गाने वळविली आहे असे धुळे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता अनंत शेलार यांनी म्हटले आहे. हा महामार्ग आता राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे वर्ग झालेला आहे. त्यामुळे त्यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या गुणवत्तेचा तेवढ्या रुंदीचा नवा पुल निर्माण करण्याच्या कामाचे आरेखन – इस्टिमेट व अन्य पेपरवर्कला आतापासून सुरुवात करायला हरकत नसावी. टक्केवारी प्रेमी पुढारी काही मागणी करतील याची यापुढे वाट न पहाता दर्जेदार काम कसे होईल यावर भर द्यायला हवा. देश पातळीवरील सारंगखेडा यात्रा प्रसंगी होणारा ट्रॉफिक जाम व वाहतूक वळविण्याची वारंवार येणारी वेळ पाहता सारंगखेडा – टाकरखेडा दरम्यान नवीन विस्तृत वळण रस्ता व तापीवर नवीन रुंद पुलाचे नियोजन होणे गरजेचे आहे. तसेच दोंडाईचा टाकरखेडा दरम्यान पुन्हा रस्ता दुरुस्तीचे काम पुन्हा हाती घेण्यात येणार असल्याची माहिती महामार्गच्या अधिकाऱ्यांनी काल पुलाच्या पाहणी करण्यासाठी आले असता दिली. मात्र, खरी समस्या सारंगखेडा ते शहाद्याच्या रस्त्याची आहे. यावर त्यांनी एक शब्द काढला नसल्याने हा रस्ता आहे त्याच परिस्थितीत राहील हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शहादेकरांना तशी मानसिकता कायम ठेवावी लागणार आहे.

 

चौकट…

1968 मध्ये तापी नदीला आलेल्या महापुरामुळे नदीवरील पुलाला तडा गेल्याची अफवा उठली, होती. तेव्हा शासनाने पुलावरील वाहतुक बंद केली होती. पुलाला खरच तडा गेला आहे का हे पाहण्यासाठी माझ्या वडिलांना पाळण्यात बांधुन क्रेनद्वारे नदी पात्राच्या दिशेने पुलावरून सोडण्यात आले होते. निरीक्षणातून असे आढळले की पुलाला तडा गेलेला नसून त्यात टाकलेला एका ब्राकेटचे स्प्रिंग वरून एका बाजूला जास्त सरकून गेला होते. त्या वेळेस पुलावरील स्प्रिंगांना ग्रीसिंग करण्यात आले होते. माझे वडील कै. भगवानसिंग राजपूत हे त्यावेळी PWD मध्ये नोकरीला होते.

आर .बी. राजपूत, ग्रामस्थ, सारंगखेडा