सारंगखेडा यात्रोत्सवास 3 डिसेंबर पासून प्रारंभ ; जय्यत तयारीला वेग

0

शहादा । चेतक फेस्टिवल सारंगखेडा येथे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवाडे यांनी यात्रेच्या तयारीची पाहणी करत विविध कामांविषयी विचारणा केली व अंमलबजावणी करण्यास सांगितले. येत्या 3 डिसेंबर पासून श्री एकमुखी दत्त यात्रेला सुरुवात होत असून त्यापूर्वी यात्रेची दखल घेत आढावा बैठक घेण्यात आली. सारंगखेडामध्ये ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यास सांगितले, आरोग्य विभागास घोड्याविषयी असलेल्या औषधी उपलब्ध करणे, पाणीपुरवठा विभागास टँकरची व्यवस्था करणे, ग्रामपंचायत मार्फत इ घंटा गाडीची सुविधा पुरविणे, गावातील घनकचर्‍याची योग्य विल्हेवाट करण्यास सांगितले.

सोयीसुविधांचा आढावा
मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाले , सारंगखेडा या गावात यात्रेनिमित्ताने अनेक लोकांना रोजगार उपलब्ध होत असतो. या यात्रेच्या माध्यमातून आपल्या स्वतःच्या मूलभूत गरजा पूर्ण करत असतात. तरी यालोकांपर्यंत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेक सोयी सुविधा पुरविण्यात येतील अशी माहिती त्यांनी दिली. चेतक फेस्टिवल आयोजन समितीचे अध्यक्ष जयंपालसिंह रावल यांनी बैठकीची प्रस्तावना केली.

संकेतस्थळावर माहिती उपलब्ध
चेतक फेस्टिवलच्या विविध कार्यक्रमांची जय्यत तयारीला सुरुवात चालू झाली आहे. प्रमुख आकर्षण म्हणून गितगायन स्पर्धा (व्हॉईस ऑफ सारंगखेडा) व समूह नृत्य स्पर्धा (युवामहोत्सव) स्पर्धेंत प्रथम येणार्‍यास एक लाखांचे बक्षीस देण्यात येणार आहे. महिलांसाठी मिसेस सारंगी नावाची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तसेच चेतक फेस्टिवल नावाची चित्रकला स्पर्धा घेण्यात येणार आहे. यात्रेविषयी संपूर्ण माहिती चेतक फेस्टिवलच्या संकेत स्थळावर उपलब्ध असून संपूर्ण माहिती मिळू शकते.

विविध विषयांवर चर्चा
उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीष सांगळे व गट विकास अधिकारी श्रीराम कागणे स्वागत केले. चेतक फेस्टिवल आयोजन समिती सोबत यात्रेच्या विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी पाणीपुरवठा अधिकारी जी. जे. मराठे, रणजित कुर्‍हे, वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश पाटील, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश देशमुख, डॉ. सागर परदेशी उपस्थित होते. सूत्रसंचालन सुजाता पाटील, महिला समिती सदस्य अनामिका चौधरी यांनी केले तर आभार ग्रामविकास अधिकारी आर. आर. बोरसे यांनी मानले.

आतापर्यंत या स्पर्धेचे स्वरूप काहीसे मर्यादित होते. परंतु चेतक फेस्टिवलच्या माध्यमातून हे कार्यक्रम देशाच्या विविध प्रांतात पोहचले असून अधिकत्तम ही यात्रा अजून विविध देशात पोहचविण्याचा प्रयत्न आहे.
– अध्यक्ष : जयपाल रावल