सारंगखेडा येथील तापी नदीवरील पुलाचे भगदाड रात्रीतून रस्त्याच्या दोन्ही टोकांपर्यंत गेल्याने ते अधिकच मोठे झाले
(प्रा. डी. सी. पाटील)
शहादा, ता. १९: सारंगखेडा येथील तापी नदीवरील पुलाचे भगदाड रात्रीतून रस्त्याच्या दोन्ही टोकांपर्यंत गेल्याने ते अधिकच मोठे झाले आहे. या भगदाडासह पुलाच्या सर्वच भागाचीही देखभाल दुरुस्ती आवश्यक आहे अन्यथा या घटनेची पुनरारुत्ती नाकारता येत नाही. त्यामुळे आता हा रस्ता वाहतुकीसाठी कधी सुरू होईल याची शाश्वती कोणीही देवू शकत नाही. पन्नास वर्षांपेक्षा अधिक आयुष्मान झाले असल्याने या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट दर वर्षी होणे आवश्यक होते. ग्रामस्थांशी याबाबत चर्चा केली असता बहुदा ती प्रत्यक्षात न करता कागदोपत्री दाखविण्याची किमया करण्यात आली असावी. त्यामुळे पुलाच्या भगदाड पडण्याची घटना ही संबंधित विभागाचे अधिकारी आणि ठेकेदार निर्मित असल्याने म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.
त्या सोळा चाकी ट्रोला ऐवजी बस किंवा लहान गाडी मुळे भागदाड पडले असते तर महाड सारखी घटना होवून जीवित हानी झाली असती. सोनगीर ते शहादा या राष्ट्रीय महामार्गावरील धुळे-नंदूरबार या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या सारंगखेडा येथील तापी नदीवरील पुलावर गेल्या तीन वर्षापासून संबंधित यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे पुलाला धोका निर्माण झाला. त्यामुळे ज्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे हे घडले त्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी सोशल मीडियाच्या माध्यमातून होत आहे.
*पहिला स्प्रिगं पुल … सारंगखेडा येथील तापी नदीवरील पुल हा स्वातंत्र्यानंतरचा महाराष्ट्रातील पहिला स्प्रिंग पुल आहे. सोलापूर, औरंगाबाद, शहादा, धडगाव प्रमुख राज्य मार्ग क्रमांक एकला जोडणाऱ्या सारंगखेडा तापी नदीवरील या पुलाचे भूमिपूजन 1950ला झाले. तत्कालीन ब्रिटिश संस्थेने पुलाचे काम वेळेत केल्याने सन 1952ला हा पुल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. पुलाची लांबी 700 मिटर असून ११ खांबांवर उभा आहे. पुलाची उंची २१.३४ मिटर आहे. पाण्याची उच्चतम पातळी ४०० फुट आहे. त्या वेळेस रशियन तंत्रज्ञानाच्या वापर करण्यात आला होता. या पुलाच्या कामावर १५०० मजूरांनी काम केले आहे . यासाठी ३६ लाख रुपये खर्च झाला होता. पुलाच्या प्रत्येक खांबाच्या वरच्या भागाला स्प्रिंग लावले आहेत. त्यामुळे वाहने चालताना पूल मागे पुढे होतो.
1959 व 1968ला महापूर आला होता. त्यातील 1968च्या पुरामुळे रोलर बेअरिंगमध्ये बिघाड झाल्याने बांधकाम विभागाने न्यू मॅटिक जॅक वापरून देखभाल दुरुस्ती केली होती. तदनंतर पुलाचे काम करणाऱ्या संस्थेने 1972ला या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची सूचना केली होती. पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे गावातील जुन्या जाणत्या व्यक्तींनी सांगितले. पुन्हा 2006च्या महापुरानंतर पुलाची दुरुस्ती करण्यात आली होती.
हा पुल पूर्वी राज्य महामार्गाला जोडलेला होता. मात्र 2019ला तो राष्ट्रीय महामार्गकडे वर्ग करण्यात आला. राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा प्राप्त झाल्यापासून त्या दृष्टीने कोणतेही ठोस काम या मार्गावर झालेली नाही . पुलावरील संरक्षक कठडे, पिलर, जॉईंट यांची प्रचंड दुरावस्था झाली आहे. 28 सप्टेंबर 2021ला या पुलाचा टाकरखेडा गावाच्या बाजूने असलेला सपोर्टिंग पिचिंगचा भराव वाहून गेल्याने धोका निर्माण झाला होता. त्यावेळी विभागाकडून साडेतीन कोटी रुपये खर्च करून अपात्र ठेकेदाराकडून भरावाचे काम करण्यात आले. आता पुरामुळे पुन्हा तोच भराव वाहून गेल्याने भागदाड पडल्याचे सांगितले जात आहे. म्हणजे अवघ्या दोन वर्षात अपात्र ठेकेदाराकडून निकृष्ट दर्जाचा भरावाचे काम झाल्याने ही घटना घडली आहे. आता पुन्हा याच कामासाठी पाच कोटींची निविदा निघाल्यास आश्चर्य नाही.
शहादा ते दोंडाईचा रस्त्याची दुरुस्तीसाठी १७ कोटी रुपयांचे टेंडर मंजूर करण्यात आले आहे. या कामाची सुरुवात पावसाळ्यानंतर करण्यात येणार आहे. या कामात पुलावरील खड्डे भरण्यात येणार आहे. मात्र पुलाचे आयुष्य कसे वाढेल हा संशोधनाचा विषय आहे.
*स्ट्रक्चरल ऑडिट खरेच झाले का?
किमान शंभर वर्ष आयुष्यमान असलेल्या हा पुल अधिकारी आणि ठेकेदार यांच्या मिलीभगतमुळे अवघ्या 70व्या वर्षी आचके द्यायला लागला आहे. 1972ला दरवर्षी स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची सूचना मिळाली असताना पुलाचे प्रत्यक्षात स्ट्रक्चरल ऑडिट करताना काल पर्यंत कोणतेही पथक दिसून आले नसल्याचे ग्रामस्थांशी चर्चा करताना स्पष्ट झाले. जर ऑडिट झाले नसेल तर त्यामागची कारणमिमांसा होणे आवश्यक आहे. जर ऑडिट झाले असेल तर ते प्रत्यक्ष न करता खानापूर्ती झाल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे स्ट्रक्चरल ऑडिट संदर्भातील चौकशी वरिष्ठ पातळीवरून होणे आवश्यक आहे. तसेच यातील दोषी कार्यकारी अभियंता, उपअभियंता व अधिकारी यांचेवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आहे.
चौकट: दरवर्षी प्रत्येक पुलाचे ऑडिट करून त्याचा अहवाल सादर करावा लागतो असा शासकीय नियम आहे. ऑडिट करताना दरवर्षी रिबाउंड हॅमर यंत्राद्वारे पुलाची विना-विध्वंसक चाचणी केली जाते. त्यावर संबंधित कार्यकारी अभियंत्याच्या स्वाक्षरीसह शिक्काही असतो. आता या पुलाचे वार्षिक ऑडिट होत होते की ते केवळ कागदावरच केले गेले याचे संशोधन होणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
वेगळी चौकट:
*सामान्यांना आर्थिक भुर्दंड…
शहादा ते धुळे 90 किलोमिटर अंतर असून बस भाडे 130 रुपये आहे. मार्ग बदलल्याने आता शहादा ते शिरपूर 55 किलोमिटर तेथून धुळे 50 मिळून 90 ऐवजी 105 किलोमिटर अंतरासाठी 165 रुपये भाडे द्यावे लागेल. तर नंदुरबार मार्गे गेल्यास 40 किलोमिटरचा फेरा वाढून 195 भाडे द्यावे लागणार आहे. सर्व सामान्यांना अधिकाऱ्यांच्या बेपर्वाई मुळे हा आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे.