खालापूर, (अरुण नलावडे) : पाणी हे जीवन आहे, असे कायमच म्हटले जाते. पाण्याशिवाय कोणीही जिवंत राहूच शकत नाही, हे शाश्वत सत्य आहे. मात्र, रायगडसारख्या मुंबईजवळील जिल्ह्यात आजही लोकांना पाण्यासाठी जीव धोक्यात घालावा लागत आहे. इतकेच नाही तर पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. त्यामुळे महिलांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या साजगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील सारसनमध्ये महिलांना जीव धोक्यात घालून पिण्याचे पाणी आणावे लागत आहे. खालापूरात साजगाव ग्रामपंचायत आर्थिकदृष्ट्या सक्षम म्हणून परिचित आहे. मुलभूत सुविधा सोडवण्यातही ग्रामपंचायतीला अपयश आले आहे. पदाधिकारी आपल्याच मस्तीत मश्गुल असल्याने नागरिकांचे मात्र हाल होत आहेत.
साजगाव ग्रामपंचायतीची दोन कोटी रूपये खर्चाची पाणी योजना कार्यान्वीत आहे. मात्र, या योजनेतून येणारे पाणी पिण्यायोग्य नसल्याने सारसन गावाला एका बोरवेल मधून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. ही बोरवेल मागील 10 दिवसांपासून बंद असल्याने महिलांना पिण्याचे पाणी आणण्यासाठी मैलभर पायपीट करावी लागत आहे. येथील खेतान या कंपनीतून आणि सुनिल पाटील यांच्या फार्महाऊसमधून महिलांना भर उन्हात डोक्यावर तीन-तीन हंडे घेवून पाणी आणावे लागत आहे. गावाशेजारील पाटील यांच्या फार्महाऊसला असलेल्या लोखंडी गेटवर चढून आपला जीव धोक्यात घालत महिला पाणी आणत आहेत.
मागील 10 दिवसांपासून इथला पाणी पुरवठा बंद आहे. तरीही ग्रामपंचायतीने याकडे ढुंकूनही पाहिले नाही, असा आरोप स्थानिक महिला करत आहेत. तसेच तक्रार केल्यानंतरही कोणी दखल घेत नसल्याचे या महिलांचे म्हणणे आहे. ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे आम्हाला जीव धोक्यात घालावा लागतो आहे. आणि दुरवरून पाणी आणावे लागते, असेही या गावातील महिलांनी सांगितले.
अनेक अडथळे पार केल्यानंतर पाणीपुरवठा योजना कार्यान्वीत झाली. त्यानंतर योजनेचे हस्तांतरण ग्रामपंचायतीकडे करण्यात आले. तेव्हा पासून ग्रामस्थांना निटपणे पाणी मिळालेले नाही. या योजनेचे पाणी महिला इतर कामासाठी वापरतात. हे पाणी पिण्यायोग्य नसल्याचा निष्कर्ष तज्ज्ञांनी काढला आहे. या योजनेवर पाणी शुद्ध करण्याचे यंत्र बसवले असते. तर पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली लागला असता. मात्र, सत्ताधार्यांची तशी मानसिकताच नसल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. पिण्याचे पाणी येत नसल्याने अनेक जण 20 लिटरच्या एका जारसाठी 25 रूपये मोजून पाणी विकत घेत आहेत.
गेली साडेचार वर्षं ग्रामस्थांना अशा समस्यांचा सामना करावा लागतो आहे. सत्ताधारी मात्र सत्तेच्या मस्तीत आहेत. महिलांना पाणी आणताना जीव धोक्यात घालावा लागतो. भविष्यात एखादा अपघात झाला तर जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित होतोय. पिण्याचे पाणी नसल्याने महिलांमध्ये संताप असून साजगाव ग्रामपंचायतीचा गलथान कारभार समोर आला आहे. याबाबत ग्रामपंचायतीची बाजू समजून घेण्यासाठी संपर्क केला असता कोणीही बोलण्यास तयार झाले नाही.