सारसबाग चौपाटीवर उभारणार ‘फुड हब’

0

महापालिका, महामेट्रो व एफडीएची बैठक

पुणे : सारसबाग येथील चौपाटीच्या ठिकाणी ‘महामेट्रो फुड हब’ उभारणार आहे. महापालिका आणि अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या काळात पुणेकरांना सारसबागेची सैर करण्यासह विविध पदार्थांचाही आस्वाद घेता येणार आहे.

पुण्यासारख्या शहरात अशा प्रकारच्या खाद्यपदार्थांच्या चौपाट्या असून तेथे संपूर्ण वर्षभर गर्दी असते. मात्र, अनेकदा अशा ठिकाणी स्वच्छता तसेच अन्नपदार्थांच्या दर्जाबद्दल फारशी काळजी घेतली जात नाही. अन्न व औषध प्रशासन विभागही त्याकडे फारशी कारवाई करताना दिसत नाही. त्यामुळे राज्य शासनानेच अशा चौपाट्यांचा विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या मोठ्या शहरांमध्ये अशा चौपाट्या आहेत, त्या ठिकाणी नागरिकांना अधिकाधिक स्वच्छ तसेच दर्जेदार खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्यासाठी हे ‘फुड झोन’ उभारण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार, पुण्यातून सारसबागेबाहेरील जागेची निवड करण्यात आली आहे. या ठिकाणी असलेल्या व्यावसायिकांनाच या ‘हब’मध्ये जागा दिली जाणार आहे.

त्यानुसार, राज्यात 5 ठिकाणी ‘फुड हब’ उभारले जाणार असून त्यात मुंबई येथील जुहू चौपाटी, गिरगाव चौपाटी तसेच नागपूर आणि पुण्यात सारसबाग येथे हा प्रकल्प होणार असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले आहे. याबाबत नुकतीच महापालिका, महामेट्रो तसेच अन्न व औषध प्रशासन विभागच्या अधिकार्‍यांच्या संयुक्त बैठक झाली असून या बैठकीत या ‘हब’बाबत प्राथमिक चर्चा करण्यात आली आहे.

सर्व नियंत्रण महापालिकेच्या अखत्यारित राहणार

या प्रकल्पाबाबत झालेल्या संयुक्त बैठकीत या ठिकाणच्या स्वच्छता व अन्नाच्या गुणवत्तेची जबाबदारी ‘एफडीए’ अर्थात अन्न व औषध प्रशासनावर असणार आहे. तर पार्किंग तसेच इतर भौतिक सुविधांची जबाबदारी महामेट्रो आणि महापालिकेकडे असणार आहे. या शिवाय, या हबमध्ये या ठिकाणी असलेल्या व्यावसायिकांनाच संधी दिली जाणार असून त्यांची लवकरच बैठक घेऊन त्यांना या नवीन उपकेंद्राची माहिती दिली जाणार आहे. तर या ‘हब’चे सर्व नियंत्रण महापालिकेच्या अखत्यारित असणार आहे.