नवी दिल्ली-सार्क परिषदेसाठी पाकिस्तानने भारताला निमंत्रण दिले आहे. मात्र या परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणार नसल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. दहशतवाद आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाही, असे सांगत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी या सार्क परिषदेसाठी भारताच्या वतीने कोणीही इस्लामाबादेत जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे.
‘सार्क’मध्ये भारत, बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळ, भूतान, श्रीलंका, मालदीव आणि अफगाणिस्तान या आठ देशांचा समावेश आहे. या परिषदेत सार्कच्या सदस्य राष्ट्रांनी नियमित एकत्र येणे अपेक्षित असताना ३२ वर्षांत फक्त १८ वेळा ते एकत्र आले आहेत. २०१६ मध्ये पाकिस्तान येथे होणारी १९ वी शिखर परिषद भारतासह बांग्लादेश, भूतान, अफगाणिस्तान यांनी बहिष्कार टाकल्याने रद्द झाली. याला उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याची पार्श्वभूमी होती.
पाकिस्तानमध्ये आता पंतप्रधानपदी इम्रान खान असून भारताशी चर्चा करण्यास उत्सुक असल्याची भूमिका त्यांनी या पूर्वीही मांडली होती. गुरू नानक यांच्या ५५० जयंतीनिमित्त कर्तारपूर मार्गिका खुली करीत असल्याचे पाकिस्तानने भारताला कळवले होते. यामुळे दोन्ही देशांमधील संबंध सुधारतील, अशी आशा व्यक्त होत होती. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने इस्लामाबदमधील सार्क परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण पाठवले होते. याबाबत मोदी काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.