सार्थक-श्रुतीचे मारेकरी सापडले

0

लोणावळा : लोणावळ्यासह राज्यात खळबळ उडालेल्या सार्थक वाकचौरे आणि श्रुती डुंबरे यांच्या दुहेरी खून प्रकरणाचा छडा लावण्यात अखेर पोलिसांना यश आले आहे. सव्वादोन महिन्यांनी या खुनाची उकल करणार्‍या पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अखेर दोघांना ताब्यात घेतले आहे. आरोपींमध्ये असिफ शेख व सलिम शेख उर्फ सँन्डी (दोघेही रा. लोणावळा) यांचा समावेश आहे. आरोपी हे नशेखोर असून किरकोळ पैशांसाठी हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

तपासासाठी मोठी यंत्रणा
सव्वादोन महिन्यांपूर्वी 3 एप्रिलला सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या सार्थक वाकचौरे व श्रुती डुंबरे यांचे लोणावळा-ऍम्बी व्हॅली रस्त्यावर आयएनएस शिवाजी केंद्राजवळ मृतदेह आढळले होते. त्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी या खुनाच्या तपासासाठी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, पोलीस अधिक्षक सुवेझ हक, अतिरिक्त अधीक्षक राजकुमार शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील 14 अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन केलेल्या 8 तपास पथकांनी घटनास्थळ व परिसर पिंजून काढला. सव्वादोन महिने तपास करूनही या प्रकरणातील आरोपींना पकडण्यात यश येत नव्हते.

दोन हजाराहून अधिक जणांची चौकशी
7 मे रोजी या हत्याप्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात आली होती. 7 अधिकार्‍यांसह 25 कर्मचारी या तपास पथकात सहभागी झाले होते. याप्रकरणी सायबर तज्ज्ञांची मदत घेतली गेली. त्यासोबतच या खुनासंदर्भात पोलिसांना माहिती देणार्‍यास 50 हजार रुपयांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले होते. वेगवेगळ्या स्तरावर करण्यात आलेल्या या तपासात खुनामागील वेगवेगळ्या शक्यता पडताळताना जवळपास दीड लाख फोन कॉल्स, मयत युवक व युवती यांचे मित्र, रेकॉर्डवरील गुन्हेगार, फोन कॉल्सवरील संशयित अशा जवळपास दोन हजारांहून अधिक जणांची चौकशी केली होती. अखेर पोलिसांना सव्वादोन महिन्यानंतर या खुनाच्या तपासात यश प्राप्त झाले.