राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरदराव पवार यांना जाहीर करण्यात आलेल्या पद्मविभूषण पुरस्काराचे ‘टायमिंग’ आणि त्या अनुषंगाने घडणार्या घटनांवर मोठ्या प्रमाणात चर्वण करण्यात येत आहे. याला अनेक कंगोरे असल्याचा दावादेखील करण्यात येत असला तरी पवारांना मिळालेला हा पुरस्कार महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकीय क्षेत्रात महत्त्वाचे स्थान असणार्या एका महनीय व्यक्तिमत्त्वाचा सार्थ गौरव आहे, हे निश्चित.
शरद पवार नावाचे गूढ उकलण्याचा प्रयत्न अनेकदा करण्यात येत असला तरी यात कुणाला फारसे यश लाभले नसल्याची बाब जगजाहीर आहे. विशेष करून अनेकदा स्वकियांचाच ‘गेम’ करण्याबाबत टिकेचे लक्ष्य बनणारे पवार यांचा विरोधकांसोबत असणारा सलोखादेखील भल्याभल्यांना चकीत करणारा ठरतो. खरं तर कोणतेही पुरस्कार निरपेक्षतेने दिले जात नाहीत. देशातील सर्वोच्च नागरी सन्मान असणारे पद्म पुरस्कारही याला अपवाद नाहीत. यावर स्पष्टपणे केंद्रात सत्तारूढ असणार्या पक्षाच्या विचारधारेची प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष छाप असते.
या वर्षीच्या पुरस्कारार्थींमधील काही नावे ही याकडेच अंगुलीनिर्देश करणारी आहेत. यात पद्मविभूषणच्या यादीत भाजपचे ज्येष्ठ आणि गेल्या काही वर्षांपासून नाराज असणारे नेते मुरलीमनोहर जोशी यांचे नाव आहे. भाजपचेच मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री सुंदरलाल पटवा आणि एनडीए सरकारमध्ये सहभागी असणारे पी. ए. संगमा या दोघांनाही मरणोत्तर पद्मविभूषण प्रदान करण्यात आले आहे. मात्र, उघडपणे भाजपची कधीही साथसंगत न करणारे शरद पवार यांना थेट देशातील दुसर्या क्रमांकाचा नागरी सन्मान मिळतो, याचे रहस्योद्घाटनही फारसे सोपे नाहीच. अर्थात, हीच त्यांची किमया आहे. पवारांच्या राजकीय कारकिर्दीस 50 वर्षे पूर्ण होत असताना जाहीर झालेला हा पुरस्कार त्यांच्या वाटचालीचा केलेला यथार्थ गौरव आहे. खरं तर या गत पाच दशकांमध्ये राजकारणातील अनेक बाबी बदलल्या. राजकीय पक्ष, त्यांच्या विचारधारा, नेते व त्यांचे अनुयायी, राजकारणातील नितीमूल्ये आदींमध्ये आमूलाग्र बदल झाला. मात्र, या बदलांना तातडीने आत्मसात करत ज्या पद्धतीने शरद पवार यांनी आपली वाटचाल केली, ती बाब अत्यंत आश्चर्यकारक आहे.
यामुळे त्यांच्यासोबत अनेक मातब्बरांचा उदय होत ते लयासही गेले असले तरी त्यांचा करिश्मा कायम आहे. पवार यांच्या मर्यादा, आजवर अनेक आघाड्यांवर आलेले अपयश आदींचा विचार करूनही इतक्या दीर्घ काळापर्यंत राजकीय क्षेत्रात आपला प्रभाव कायम राखणे हीच त्यांची महत्ता असल्याचे त्यांचे विरोधकही मान्य करतात. शरद पवार हे नेहमीच तोलून-मापून सौदा करतात, असेही नाही. ते ‘रिस्क’ घेतात. यातूनच महाराष्ट्रात अत्यंत प्रबळ असणार्या काँग्रेसच्या विरोधात ‘पुलोद’ची चूल मांडण्याचे धाडस ते दाखवू शकले. अर्थात त्याच काँग्रेसमध्ये परतण्याचा लवचिकपणाही त्यांच्यात आढळून आला. सोनिया गांधी राजकारणात सक्रिय झाल्याने आता काँग्रेसमध्ये आपल्याला पंतप्रधानपद कठीण असल्याचे दिसून येताच त्यांनी सोनियांच्या विदेशीपणाला विरोध करत राष्ट्रवादी पक्ष स्थापन केला आणि आश्चर्यकारकरित्या त्याच काँग्रेसची दीड दशकापर्यंत केंद्र व राज्यात सोबत केली, या सर्व बाबी किती विलक्षण आहेत हो ! एवढेच नव्हे तर 2014च्या विधानसभा निवडणुकीत युती आणि आघाडी तोडण्याच्या पडद्याआडच्या नाट्यातील एक प्रमुख सूत्रधार पवार असल्याचे ते जेव्हा भाजपला न मागता पाठींबा देतात तेव्हाच स्पष्ट होऊ जाते. अर्थात, तेव्हापासून भाजप आणि शरद पवार यांच्यातील उघड सलोखा हा पद्मविभूषण पुरस्कारापर्यंत येऊन पोहोचला असल्याचे ढोबळ राजकीय विश्लेषण कुणालाही करता येईल. मात्र, यातच त्यांच्या भावी वाटचालीचा मार्ग कुठे दिसतो का? हे पाहणे त्यापेक्षा जास्त औत्सुक्याचे ठरणारे आहे.
महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतरचा राजकीय इतिहास दिवंगत यशवंतराव चव्हाण व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे तसेच शरद पवार यांना वगळून पूर्ण होणारच नाही. या तिन्ही महानेत्यांवर मराठी जनांनी भरभरून प्रेम केले. येथे तुलना करण्याचा कोणताही हेतू नाही. मात्र; आधीच्या दोन्ही मान्यवरांना पुरस्कृत करण्यात दिल्लीतील सत्ताधिशांनी हात आखडता घेतला असताना आयुष्यात बहुतांश राजकीय तडजोडींमध्ये सरशी मिळवणार्या अर्थात बेरजेच्या राजकारणात माहीर असणार्या शरद पवार यांनी पद्म पुरस्कारांमध्ये बाजी मारल्याचे आपल्याला दिसून येत आहे. के. कामराज आणि एम. जी. रामचंद्रन यांच्यासारख्या प्रादेशिक नेत्यांना ‘भारतरत्न’ने गौरविण्यात येत असताना महाराष्ट्रातील नेत्यांची दिल्लीतील सत्ताधिशांनी नेहमीच उपेक्षा केली. खरं तर मराठी माणूस दिल्लीत ‘लॉबिंग’ करण्यात कमी पडत असल्यावर वारंवार चर्चादेखील होत असते. मात्र, दिल्ली दरबारातील सर्व राजकीय शह-काटशहांना पुरून उरणारे सध्या तरी शरद पवार हेच एकमेव नेते आहेत, यावर दुमत असू शकत नाही.
आता पद्मविभूषण पुरस्कारानंतर याला नव्याने फोडणी मिळणार आहे. पंतप्रधानपदासाठी सर्वार्थाने सक्षम असूनही पवार यांना या पदाने हुलकावणी दिली असून बदलत्या राजकीय वातावरणात ही बाब नजीकच्या काळात धूसर असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमिवर याच वर्षी होणार्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत ते सर्वमान्य उमेदवार ठरण्याची शक्यता असल्याचे चर्वण सुरू आहे. महाराष्ट्रातील युतीतील तणावासह अन्य राजकीय घटनांमध्ये याचे बिजारोपण झाले आहेच आणि हे सारे होत असताना या पटकथेचे एक सूत्रधार असणारे शरद पवार यांना जाहीर झालेले ‘पद्मविभूषण’ हा पुन्हा एकदा विलक्षण योगायोगाचा आणि खरं तर त्यांच्या राजकीय चातुर्याचा नवीन अध्याय मानला जाणार आहे. देशातील हा दुसर्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाल्याबद्दल शरदराव पवार यांचे पुन्हा एकदा मन:पूर्वक अभिनंदन!