तळेगाव दाभाडे : पुढील महिन्यात येत असलेल्या सार्वजनिक गणोशोत्सवाच्या नियोजनाची तयारी शहरातील विविध सार्वजनिक मंडळाकडून उत्साहाने सुरू झाली असून यावर्षी आपल्या मंडळाचे देखावे, आरास आणि विद्युत रोषणाई तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम याबाबतचे नियोजन काय असावे याबाबतच्या चर्चा सध्या चालू आहेत.
तळेगाव शहरात सार्वजनिक गणेशोत्सवाची ऐतिहासिक परंपरा आहे लोकमान्य टिळकांनी या शहरातील सार्वजनिक गणोशोत्सव सुमारे 100 वर्षांपूर्वी सुरू केला. या उत्सवात शहरातील विविध मंडळे अतिशय कल्पकतेने हा उत्सव आबलवृद्धांच्या सहभागातून साजरा करण्यात येतो. सार्वजनिक गणोशोत्सवाची तयारी म्हणून शहरातील विविध भागातील मंडळाकडून कामकाज चाललेले आहे. उत्सव काळातील मंडळाची कार्यकारिणी निवडण्याचे काम सध्या काही मंडळाकडून होत आहे तर काही मंडळाकडून झालेले आहे त्यासाठी मंडळाकडून आपआपल्या भागात बैठका चर्चा सुरु झाल्या आहेत. देखावे आणि आरास तसेच कार्यक्रमाची तयारी याबाबत कार्यकर्त्यामध्ये चर्चा चालू आहेत. सार्वजनिक गणोशोत्सवाकरिता लागणारा गणेश मंडप, स्पीकर तसेच विद्युत रोषणाई करणार्या ठेकेदारांबरोबर काही मंडळांनी करारही केलेले आहेत, तर काही मंडळाचे कार्यकर्ते देखाव्यासाठी लागणार्या मूर्ती कामामध्ये गुंतलेले आहेत.
सध्या दररोज मंडळाच्या कार्यालयामध्ये रात्री पदाधिकारी व कार्यकर्ते जमत असून उशिरापर्यंत नियोजनाबाबत चर्चा करीत आहे. गणेशउत्सवाकरिता गणरायाच्या मूर्ती बनविण्याचे काम स्थानिक कलाकार आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून अहोरात्र जागून करण्यात येत असून 40 ते 45 टक्के काम पूर्ण झालेले आहे.