सार्वजनिक जागेत थुंकल्याने मास्तरला 5 हजार दंड

0

शिरपूर न्यायालयाचा निकाल

शिरपूर: कोरोना काळात शहर पोलीस ठाण्याच्या आवारात गुटखा खाऊन थुंकत इतरांच्या जीवितास धोकादायक कृत्य करणार्‍या शिक्षकास 17 फेब्रुवारीला शिरपूर न्यायालयाने 5 हजार रुपये दंड केला आहे. मिलिंद मधू बिरारे (वय 50, रा. भुपेशनगर, शिरपूर) या शिक्षकाविरुद्ध 17 जून 2020 रोजी, पोलीस स्टेशन आवारात गुटका खाऊन थुंकल्याने पो. कॉ. महेंद्र सपकाळ यांनी इतरांच्या जीवितास धोकादायक कृत्य व कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यावरून शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. या फिर्यादीवरून विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात
आला होता.

उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल माने व पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाधिकारी पोहेकॉ गुलाब ठाकरे व पोकॉ ए. ए. काजी आणि पोकॉ कैलास पवार यांनी शिरपूर येथील प्रथम वर्ग न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. दाखल गुन्ह्यात न्यायालयात दोषारोप सिद्ध झाल्याने न्यायाधीश देशमुख यांनी शिक्षक मिलिंद मधू बिरारे यास 5 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या गुन्ह्यात पो. हे. कॉ गुलाब ठाकरे यांनी तपास केला तर न्यायालयात सरकारी वकील अवधूत भावसार यांनी कामकाज पाहिले. आगामी काळात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिक कारवाई करण्याचे संकेत शहर पोलीस निरीक्षक हेमंत पाटील
यांनी दिले आहेत.