मुंबई । तब्बल 8 दिवसांनंतर निवासी डॉक्टरांनी पुकारलेला राज्यव्यापी बंद आता मागे घेण्यात आला आहे. सुरुवातीला ‘आयएमएम’ने संपातून माघार घेण्याची घोषणा केली. त्यापाठोपाठ ‘मार्ड’ नेही संप मागे घेत असल्याचे जाहीर केले. संप मागे घेत असल्याचे प्रतिज्ञापत्र मार्डने मुंबई हायकोर्टात सादर केले आहे. आज नवव्या दिवशी म्हणजे शनिवारी सकाळी 8 वाजेपर्यंत कामावर रुजू होण्याचे आश्वासन मार्डच्या वतीने वकिलांनी कोर्टात दिले आहे. डॉक्टर उद्या कामावर आले नाहीत, तर सरकार किंवा मुंबई महापालिका त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करेल, असा इशारा मुंबई हायकोर्टाने आंदोलक डॉक्टरांना दिला होता. त्यानंतर मार्डने सकाळी 8 वाजेपर्यंत कामावर रुजू होण्याचे आश्वासन कोर्टात दिले आहे.
…तर लोकच तुम्हाला मारतील – उच्च न्यायालय
तत्पूर्वी उच्च न्यायालयाने संपाबाबत तीव्र संताप व्यक्त केला होता. लोकांच्या हालाला पारावार राहिला नाही, तर लोक तुम्हाला मारतील आणि त्याची जबाबदारी तुमच्यावरच असेल, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने संपकरी डॉक्टरांना फटकारले होते. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही कामावर रुजू न होणार्या डॉक्टराविरोधात न्यायाधीशांनी प्रचंड संताप व्यक्त केला होता. ‘आम्ही कालपर्यंत तुमच्याबद्दल सहानुभूती बाळगून होतो. पण आता आमच्या मनात तुमच्याबद्दल कुठलीही सहानुभूती नाही. शब्द देऊन तुम्ही फिरवता, तुम्ही कोर्टाशी खेळत आहात. यापुढे राज्य सरकार आणि महापालिकेकडून तुमच्याकडून जी कारवाई होईल त्यासाठी तयार राहा’, असे कोर्टाने डॉक्टरांना बजावले होतेे. सध्या जे सुरू आहे ते असेच सुरू राहिले, तर लोकांच्या सहनशक्तीचा अंत होईल आणि ते तुम्हाला मारतील, अशी भावना यावेळी न्यायाधीशांनी व्यक्त केली होती.
‘किती संयम दाखवायचा इनफ इज इनफ’ – मुख्यमंत्री फडणवीस
निवासी डॉक्टरांच्या संपाबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज (शुक्रवारी) विधानसभेत निवेदन सादर केले. डॉक्टरांनी आडमुठे धोरण स्वीकारल्याने फडणवीस कमालीचे संतापले होते. सरकारने निवासी डॉक्टरांच्या मागण्या मान्य करूनही ते कामावर येण्यास तयार नाहीत. राज्याचा मुख्यमंत्री, वैद्यकीय शिक्षण मंत्री त्यांना विनवणी करतात. उच्च न्यायालय त्यांना कामावर रुजू होण्याच्या सूचना करतात तरीही हे कामावर येत नाहीत. आणखी किती संयम दाखवायचा? इनफ इज इनफ, राज्यातील गरीब रुग्ण मृत्यूशय्येवर आहे. आज शेवटची बैठक मी घेणार आहे, त्यात त्यांना हात जोडून कामावर कामावर रुजू होण्याची मी विनंती करेन. जर त्यांनी ऐकले नाही तर कायदेशीर कारवाईस त्यांना सामोरे जावे लागेल, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडवणवीस यांनी निवासी डॉक्टरांना निर्वाणीचा इशारा दिला होता.
संपामुळे राज्यात 377 रुग्ण दगावले
डॉक्टरांच्या संपामुळे राज्यभरात 377 रुग्ण दगावल्याची माहिती वकिलांनी मुंबई हायकोर्टात दिली तसेच मुंबईत डॉक्टरांच्या संपकाळात उपचाराअभावी सरकारी रुग्णालयातील 181 रुग्ण दगावल्याचा दावाही वकिलांनी केला. उपचाराअभावी बीएमसीच्या तीन रुग्णालयांमध्ये 135 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये केईएममधील 53,नायर 34 आणि सायन रुग्णालय 48 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती वकिलांनी दिली. इतकंच नाही तर राज्यभरातील रुग्णालयातील 380 जणही उपचाराअभावी दगावल्याचा दावा, वकिलांनी केला.
राज्यभरातील दगावलेल्या रुग्णांची आकडेवारी
जेजे रुग्णालय – 32, जीटी- 5, सेंट जॉर्ज – 8, कामा -1, जीएमसी, मिरज – 35, वीएमएमसी, सोलापूर-26, जीएमसी,नागपूर – 18, वीएन जीएमसी, यवतमाळ-18, जीएमसी, अकोला – 23, जीएमसी, औरंगाबाद – 57, स्टार जीएमसी, अंबाजोगाई – 19, केईएम-53, नायर – 34, सायन – 48