सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणार्‍यांवर होणार आता पोलिसांची दंडात्मक कारवाई

0

नवी मुंबई । खुल्लेआम धूम्रपान करणार्‍यांचा सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होतो. विद्यार्थी आणि तरुणांमध्ये तंबाखू सेवनाचे प्रमाण वाढले आहे. धूम्रपानामुळे अनेकांना तोंडाच्या कर्करोगाला बळी पडावे लागते. तेव्हा यापुढे प्रतिबंध असताना देखील सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करून कायद्याचे उल्लघंन करणार्‍यांवर सिगारेट-तंबाखूजन्य पदार्थ विक्री प्रतिबंध कायदा ( कोटपा ) अंतर्गत कडक कारवाई केली जाणार असल्याचे नवी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी सांगितले. कोटपा कायद्यांचे खास प्रशिक्षण नवी मुंबई पोलिसांना देण्यात आले असून त्यांनी प्रत्यक्ष अंमलबजावणी शहरात सुरू आहे. सार्वजनिक ठिकाणी तसेच शाळा परिसरात खुल्लेआम सिगारेट फुंकणार्‍यावर, तसेच तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध विक्रीवर लगाम घालणार्‍यासाठी राज्याचे गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली तंबाखूमुक्त महाराष्ट्र अभियान हाती घेण्यात आले आहे.

त्याचा एक भाग असलेल्या सिगारेट- तंबाखूजन्य पदार्थ विक्री कायदा -2003 ( कोटपा )च्या अंमलबजावणीसंदर्भात नवी मुंबई शहर पोलीस आयुक्त कार्यालयात मंगळवारी (दि. 17 ) नवी मुंबई शहर पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली सह पोलीस आयुक्त प्रशांत बुरडे, पोलीस उपायुक्त तुषार दोषी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे पोलीस निरीक्षक सुनील बाजारे, पोलीस उप निरिक्षक राणी काळे, अजित गोळे यांच्या सहकार्याने एका विशेष कार्यशाळेचे आयोजित करण्यात आले. यावेळी संबंध हेल्थ फाऊंडेशन संस्थेचे महाराष्ट्र प्रकल्प प्रमुख डॉ. दीपक छिब्बा, व्यवस्थापक देवीदास शिंदे, कर्करोग तज्ञ डॉ. प्रशांत पवार, समनव्यक श्रीकांत जाधव यांनी कोटपा कायद्यावर मार्गदशन केले. यावेळी सहभागी पोलीस अधिकार्‍यांनी आपल्या मनातील प्रश्‍न उपस्थित करत कार्यशाळेत जोरदार सहभाग दर्शवला. यावेळी पनवेल, खारघर, कळंबोली, कोपर, खांडेश्‍वर, उरण, कामोठे, बेलापूर, वाशी आदी पोलीस ठाण्याचे प्रमुख, उप पोलीस निरीक्षक उपस्थित होते.

धूम्रपानामुळे होणार्‍या परिणामांची हवी तशी जागृती लोकांमध्ये नाही. धूम्रपानामुळे अनेकांना कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराला बळी पडावे लागते. विशेष म्हणजे लहान वयात लागलेले कोणतेही वाईट व्यसन मरेपर्यंत सुटत नसते. कोटपासारख्या कायद्याची कडक अंमलबजावणी केल्यास सार्वजनिक धूम्रपानामुळे होणारे परिणाम कमी करणे शक्य होईल, असा विश्‍वास नवी मुंबई पोलीस उपायुक्त तुषार दोषी यांनी यावेळी व्यक्त केला.सार्वजनिक ठिकाणी केल्या जाणार्‍या धूम्रपानाचा मोठा परिणाम निर्व्यसनी लोकांवर होत असतो. तंबाखू- सिगारेट सेवनाची सवयी लागल्या की सोडवणे कठीण होऊन बसते. विद्यार्थी – तरुणांमध्ये व्यसनाचे प्रमाण वाढले आहे. नवी मुंबईत अनेक ठिकाणी बागा आहेत. अशा बागांमध्ये धूम्रपान करणार्‍याची संख्या अधिक आहे. यापुढे शाळा परिसर आणि सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणार्‍यांवर कोटपाअंतर्गत कारवाई केली जाणार असल्याचे नवी मुंबई पोलीस उपायुक्त तुषार दोषी यांनी सांगितले.

सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादने ( जाहिरात आणि व्यापार विनिमय, वाणिज्य, उत्पादन, पुरवठा व वितरण प्रतिबंध कायदा ) अधिनियम 2003 हा केंद्र सरकारचा कायदा आहे. या कायद्यात एकूण पाच प्रमुख कलमे आहेत. त्यापैकी कलम-4 नुसार सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे गुन्हा आहे, तर कलम- 7 नुसार कोणत्याही शैक्षणिक संस्थेच्या 100 यार्ड आवारात तंबाखूजन्य पदार्थ विक्रीवर प्रतिबंध आहे. कलम- 6 ब नुसार बालकांना किव्हा बालकांकडून तंबाखूजन्य पदार्थ विक्रीवर प्रतिबंध आहेत. या कायद्यानुसार 200 रुपये चलन पावती दंड किव्हा बाल न्याय कायदा 2015 नुसार 1 लाख रुपये आणि 7 वर्षाची शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. बाल न्याय कायदा कलम 77 नुसार कारवाई करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे.