लखनौ: देशात सुधारित नागरिकत्व कायदा लागू झाल्यानंतर कायद्याला विरोध करण्यासाठी अनेक ठिकाणी हिंसक आंदोलन करण्यात आली होती. उत्तर प्रदेशमध्ये हिंसक आंदोलनादरम्यान अनेक ठिकाणी सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करण्यात आले होते. नुकसान करणाऱ्या १३० जणांना नोटीस पाठवण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील वेगवगेळ्या जिल्ह्यांमधील प्रशासनाकडून ही नोटीस पाठवण्यात आली आहे. या आंदोलकांना ५० लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
नोटीस रामपूरमधील २८, संभळ येथील २६, बिजनोर येथील ४३ आणि गोरखपूरमधील ३३ नागरिकांना पाठवण्यात आली आहे. नोटीसमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, आंदोलन करताना रामपूरमध्ये १४.८ लाखांची, संभळ येथे १५ लाख तर बिजनोरमध्ये १९.७ लाखांच्या संपत्तीचं नुकसान करण्यात आलं आहे. गोरखपूरमध्ये नेमकं किती नुकसान झालं आहे याचा आढावा अद्याप अधिकारी घेत आहेत.
रामपूरचे जिल्हाधिकारी अनुजनेय कुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हिडीओत आणि फोटोमध्ये जे आंदोलक हिंसाचार करत संपत्तीचं नुकसान करताना दिसत होते त्यांनाच नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यांना उत्तर देण्यासाठी एका आठवड्याचा वेळ देण्यात आला आहे. यादरम्यान आम्ही सार्वजनिक बांधकाम विभाग, वाहतूक विभाग, नगर परिषद, पोलीस लाईन यांच्याशी संपर्क साधत हिंसाचारात झालेल्या नुकसानाची सविस्तर माहिती देण्यास सांगितलं आहे. ज्या २८ जणांना नोटीस बजावण्यात आली आहे त्यापैकी काहींना अटक करण्यात आली आहे.