जामनेर रस्त्याच्या दुरवस्थेबाबत जनआधारचे निवेदन
भुसावळ: राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यभरातील रस्ते 15 डिसेंबर पर्यंत खड्डेमुक्त होतील, असे आश्वासन दिले असले तरी भुसावळात मात्र हे आश्वासन फोल ठरल्याचा प्रत्यय शहरवासीयांना आले. राज्य मार्गाचा दर्जा लाभलेल्या जामनेर रोडवरील नाहाटा चौफुली ते साईबाबा मंदिरापर्यंतच्या रस्त्यावर जीवघेणे खड्डे पडल्याने अपघात नित्याची बाब ठरली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागासह पालिका प्रशासनाने या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष केल्याने जनआधार विकास पार्टीचे नगरसेवक दुर्गेश नारायण ठाकुर यांनी सोमवारी प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांना लेखी निवेदन देवून दखल घेण्याची मागणी केली आहे.
हजारो विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात
जामनेर रोडवर नूतन पोलीस उपअधीक्षक कार्यालय, शासकीय आयटीआय, साईबाबा मंदिर, गजानन महाराज मंदिर, ताप्ती पब्लिक स्कूल, नाहाटा महाविद्यालय असल्याने शेकडो विद्यार्थ्यांसह नागरीकांची वर्दळ या रस्त्यावरून दिवसभर असते मात्र रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अनेकदा छोटे-मोठे अपघातही येथे घडले आहे. अप्रिय घटना टळण्यासाठी संबंधित विभागाने वेळीच दखल घ्यावी तसेच या रस्त्यावरील बंद पडलेले पथदिवे तातडीने सुरू करावे, अशी अपेक्षा जनआधारचे गटनेता उल्हास पगारे, नगरसेवक दुर्गेश ठाकुर यांच्यासह अन्य पदाधिकार्यांनी यांनी निवेदनाद्वारे व्यक्त केली आहे.