सार्वजनिक मंडळांकडून गणरायाचे आगमनाची तयारी

0
जनजागृतीपर सांस्कृतिक कार्यक्रमांची आखणी
तळेगाव दाभाडे- गणरायांचे आगमन महिनाभरावर आलेले असताना तळेगाव शहर आणि परिसरातील सार्वजनिक मंडळांकडून आगमनाची तयारी जोरात सुरु झाली आहे. सार्वजनिक मंडळाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे नियोजनाच्या कामाला लागले आहेत. तळेगाव शहराचा ऐतिहासिक गणेशोत्सव जिल्ह्यात मानाचा उत्सव समजला जातो. येथील सार्वजनिक गणेशोत्सवास लोकमान्य टिळकांनी सुरुवात केलेली असून त्याला ऐतिहासिक वारसाही लाभलेले आहे. सध्या शहर परिसरात सुमारे शंभर ठिकाणी सार्वजनिक उत्सव साजरा करण्यात येते. यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सव सप्टेंबर महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात असून विविध मंडळाकडून या उत्सवाच्या तयारीसाठी कार्यकर्त्यांच्या बैठखा घेऊन मंडळाचे पदाधिकारी निवडले गेले आहे. तसेच नवनियुक्त पदाधिकारी आपल्या सहकार्यासह कार्यक्रमाचे नियोजन करीत आहे.
मुर्ती बनविण्याची लगबग
यावर्षी करण्यात येणारी आरास, देखावे, आकर्षक विद्युत रोषणाई, तसेच जनजागृतीपर सांस्कृतिक कार्यक्रमांची आखणी सध्या केली जात आहे. तर शहरातील विविध भागातील ढोल-लेझीम, झांज पथकांनी आपआपल्या पथकांचा वाद्य सराव सुरु केलेला असून कार्यकर्ते रात्री उशिरापर्यंत काम करीत आहेत. सार्वजनिक गणेशोत्सवाकरिता लागणार्‍या गणेशमूर्ती बनविणारे काही पारंपारिक मुर्तीदार-कलाकार असून त्यांचेकडून वेगाने मूर्ती बनविण्याचे काम चालू आहे. शहरात सुमारे 10 ते 15 मूर्तिकार असून आपआपले मूर्ती कारखान्यात मूर्ती बनविण्यासाठी झटत आहेत.