येरवडा : येथील सार्वजनिक व सुलभ शौचालयांची दुरवस्था झाली असून त्याचा वापर इतर सार्वजनिक कामांसाठीच होताना दिसून येतो. स्वच्छ भारत अभियानअंतर्गत मोठ्या प्रमाणावर घरोघरी शौचालये बांधून देखील सार्वजनिक शौचालयांचा वापर मद्यपानासह इतर उद्योगांसाठी होत आहे. अनावश्यक व गैरवापर होणार्या सार्वजनिक शौचालयांबाबत शासन प्रशासनाने योग्य ती उपाययोजना करणे आवश्यक आहे.
येरवडा क्षेत्रिय कार्यालयांतर्गत एकूण 34 सार्वजनिक व 128 सुलभ शौचालये आहेत. मात्र अनेक शौचालयांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. त्यांचा वापर मद्यपानासह इतर बाबींसाठी सर्रासपणे केला जात आहे. याकडे महापालिका क्षेत्रिय कार्यालयांचे दुर्लक्ष होत आहे. नागरिकांनी वेळोवेळी तक्रारी करूनही स्वच्छता, आवश्यक पाणीपुरवठा, दुरुस्ती यांकडे डोळेझाक होत असून नगरसेवकांनी निधी उपलब्ध केला तरच उपाययोजना केली जाते, अशी माहिती नागरिकांनी दिली आहे.