सार्वजनिक शौचालयांना नोव्हेंबर अखेर मिळणार सर्व सुविधा

0

ठाणे । ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व सार्वजनिक आणि सामुदायिक शौचालयांना नोव्हेंबर अखेर पाणी जोडणी, मलनि:सारण जोडणी आणि वीज जोडणी देण्याचे आदेश देतानाच महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी एक टॉयलेट एक अधिकारी नेमण्यात येवून त्यांच्या मार्फत दर महिन्याला नियमित तपासणी करण्यात येणार असल्याचे यांनी सांगितले. दरम्यान शौचालयाच्या साफ सफाईची कामे स्थानिक महिला गटांना देण्याची सूचनाही त्यांनी या बैठकीत केली. यावेळी जयस्वाल यांनी शहरातील सर्व सार्वजनिक शौचालये, सामुदायिक शौचालयांची संबंधित विभागांनी पाहणी करून ज्या ठिकाणी पाणी नळ संयोजने नाहीत त्या ठिकाणी नळ संयोजने देण्याची कार्यवाही पाणी पुरवठा विभागाचे उप नगर अभियंता यांनी करावी असे सांगितले. त्याचबरोबर या ठिकाणी वीज पुरवठा देण्याची कार्यवाही विद्युत विभागाने करण्याची सूचना करतानाच प्रत्येक शौचालयामध्ये बल्ब लावण्यात यावे असे जयस्वाल यांनी या बैठकीत सांगितले. दरम्यान मलनि:सारण विभागाने शहरातील सर्व सार्वजनिक आणि सामुदायिक शौचलये मलनि:सारण वाहिन्यांनी जोडण्याची कार्यवाही करावी असे सांगितले तर बांधकाम विभागाने सर्व शौचालयांची नियमित दुरूस्ती करावी असे सांगितले. तथापि सद्यस्थितीत सार्वजनिक शौचालये आणि सामुदायिक शौचालये साफ सफाई ज्या एजन्सीद्वारे करण्यात येते त्या एजन्सीचे कामे बंद करून ती स्थानिक महिला गटांमार्फत साफ सफाई करण्याचा सूचनाही जयस्वाल यांनी केल्या.

…तर नळजोडणी खंडित करणार
शहरातील पाणी कराची वसुली नोव्हेंबर अखेरपर्यंत न झाल्यास डिसेंबर महिन्यापासून मोठ्या प्रमाणात व्यापक नळ संयोजने खंडीत करण्याची व्यापक मोहिम हाती घेण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले आहेत. जयस्वाल यांनी सर्व अधिका-यांची बैठक घेवून विविध विषयांचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी त्यांनी पाणी कर वसुली कमी असल्याची गंभीर दखल घेवून सर्व प्रभाग समिती स्तरावरील अधिका-यांनी नोव्हेंबर अखेर वसुलीसाठी कठोर प्रयत्न करावेत असे सांगितले. दरम्यान पाणी बिलाचा रकमेबाबत काही वाद असल्यास आधी पाणी कर भरून घेण्यात यावा व नंतर जास्त रक्कम भरून घेतली असल्यास ती रक्कम पुढील सत्रातील देयकामध्ये समायोजित करण्याच्या सूचनाही जयस्वाल यांनी दिल्या.