पनवेल । स्वच्छ भारत मिशन अंतर्गत प्राप्त झालेल्या सुचनेनुसार नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व सार्वजनिक शौचालय स्वच्छता व देखभाल करण्याच्या अनुषंगाने दिनांक 23 ऑक्टोबर ते 22 जानेवारी, 2018 या कालावधीत विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहेत. त्याअनुषंगाने नवी मुंबई कार्यक्षेत्रामधील सामुदायिक व सार्वजनिक शौचालयाची किरकोळ दुरुस्ती करुन विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या विशेष मोहिमेनुसार संभाजीनगर व गौतमनगर येथे शेल्टर असोसिएशनच्या माध्यमातुन सामुदायिक व सार्वजनिक शौचालयांच्या ठिकाणी पथनाट्याचे आयोजन करुन शौचालय वापराबाबत व कचरा वर्गिकरण नागरिकांमध्ये जनजागृती केली. तसेच शहरामधील सर्व शौचालयाच्या वापराबाबत वर्दळीच्या ठिकाणी स्वच्छ भारत मिशन यांच्याकडून प्राप्त झालेले डिझाइनचे जनजागृतीसाठी बॅनर लावण्यात आले आहेत.
खत तयार करण्याची माहिती
वाशी कार्यक्षेत्रामध्ये सिद्धविनायक सोसायटीमध्ये उपस्थित नागरिकांना कचर्याचे वर्गीकरण हे कचरा निर्माण होणार्या ठिकाणीच करून ओला कचरा हिरव्या कचरा कुंडीत व सुका कचरा निळ्या कचरा कुंडीत टाकणे तसेच संस्था किंवा घरामध्येच कचर्यांपासुन सेंद्रिय पध्दतीने कंपोस्ट खत तयार करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी उपस्थितांना स्वच्छता विषयक माहिती देण्यात आली. तसेच वाशीगाव तलाव येथे नागरिकांच्या सहभागाने स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेमध्ये वाशी विभागामधील स्वच्छता अधिकारी विनायक जुईकर, स्वच्छता निरिक्षक जयश्री आढळ, उप स्वच्छता निरिक्षक मनिष सरकटे, अजीत तांडेल, भुषण सुतार, संतोष देवरस स्वच्छाग्रही व स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.