साल्या ते नाल्या

0

आज देश एका वेगळ्याच संक्रमणातून जात आहे. एकीकडे आधुनिकतेचे वारे वाहत आहेत तर दुसरीकडे मूलतत्त्ववादी विचार सतत उसंडी मारत आहेत. देशातील अनेक राज्यांमध्ये एकाच विचारांच्या राजकीय पक्षाचे राज्य प्रस्थापित झालेले आहे. असे होणे अजिबातच धक्कादायक नाही. लोकशाहीप्रधान देशात बहुमताला अग्रस्थान आहे. जनतेने निवडणुकीच्या माध्यमातून जो कौल दिलेला असतो तो कौल अंतिम मानण्याचा लोकशाहीचा दंडक आहे. या दंडकामुळेच आज भारतीय जनता पक्ष देशभरात सत्ता प्रस्थापित करून आहे. मात्र, असं असतानाच एकहाती सत्ता एका ठरावीक राजकीय पक्षाच्या हाती येण्याचे धोकेही तितकेच आहेत. एकहाती सत्ता मिळाल्यामुळे देशाचा/राज्याचा कारभार हाकताना एक प्रकारची मगरुरी येण्याची दाट शक्यता असते. या मगरुरीतूनच मग लोकशाहीचे पाईक असलेले सेवक बेताल वक्तव्य करू लागतात. अशा बेताल वक्तव्य करणार्‍या पुढार्‍यांची तर आपल्या देशाला मोठी परंपराच लाभलेली आहे. अगदी राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांपासून ते स्थानिक संस्थांपर्यंतच्या नेत्यांचा या परंपरेत समावेश करता येऊ शकतो. सध्या अशाच एका मोठ्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाने केलेल्या बेताल वक्तव्याचा मुद्दा गाजतोय… भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी तूर उत्पादक शेतकर्‍यांसंदर्भात साल्या असा शब्दप्रयोग केलाय. या शब्दप्रयोगाचे अद्याप पडसाद उमटत आहेत.

भारतीय जनता पक्षात अन्य कोणत्याही पक्षांच्या तुलनेत आक्रमक भाषणं करणार्‍या नेत्यांचा भरणा अधिक आहे, असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. मात्र, फार क्वचितप्रसंगी भाजपचे नेते बेताल वक्तव्य करताना आढळतात. यामुळेच असेल कदाचित रावसाहेब दानवेंच्या विधानाने महाराष्ट्र संतापला. याचा अर्थ दानवेंना क्लीन चिट देणे असा मुळीच नाही. कारण दानवेंनी केलेले विधान हे माफीस पात्र नाहीच. त्यांनी दिलगिरी व्यक्त केली असली तरीही राज्याच्या बळीराजाचं मन दुखावलं गेलंय, हे वास्तव आहे. मात्र, रावसाहेब दानवेंच्या बेताल वक्तव्यावर जे आगपाखड करताहेत त्यांनी स्वत:च्या अस्तनीतही एकदा डोकावून पाहिलं पाहिजे. ज्या बळीराजाची कड घेऊन विरोधक दानवेंचा निषेध करताहेत, रस्त्यावर उतरून दंगा करताहेत, शाईफेक करताहेत त्यांनी कोणत्या जमान्यात बळीराजाच्या हिताचं काम केलंय? आजचे विरोधक कालचे सत्ताधारी होते. मग त्यांच्या राजवटीतही शेतकर्‍यांनी आत्महत्या का केल्या? शेतकर्‍याला साल्या म्हणणं हा गुन्हाच आहे. मात्र, त्याचवेळेस शेतकर्‍याला आत्महत्या करण्यास भाग पाडणारी परिस्थिती निर्माण करणं, याला कोण जबाबदार? इथे कोणाच्या सत्ताकाळात शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचा आकडा कमी-अधिक होता, हा मुद्दाच नाहीय. सरकार कुणाचंही असो एकाही शेतकर्‍याने आत्महत्या केलीच नाही पाहिजे, हा मुद्दा आहे.
रावसाहेब दानवेंच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी डोंबिवलीत शिवसेनेने राडा केला. त्यावर प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनीही राडा केला. हा राडा जवळपास रात्रभर सुरू होता. यातील गमतीची बाब म्हणजे, शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष सरकार चालवताहेत. त्यामुळे शिवसेना-भाजपने केलेला हा रात्रभरचा राडा नेमका कुणासाठी होता? या राड्यातून राज्यातील कोणत्या शेतकर्‍याचे प्रश्‍न मिटले? तूर उत्पादक शेतकर्‍याची तूर खरेदी केली गेली? की शेतकर्‍याला हमीभाव मिळाला? या सर्व प्रश्‍नांची उत्तरं नाही असंच आहे. रावसाहेब दानवेंच्या वक्तव्यामुळे शेतकरी दुखावला हे शंभर टक्के खरेच, पण त्यांच्या विधानानंतर जो निषेधाचा तमाशाचा फड राज्यभर रंगला त्यातून नेमकं काय निष्पन्न झालं? ना दानवेंचा राजीनामा घेतला गेला आणि नाही शेतकर्‍यांच्या अनेक प्रश्‍नांपैकी कोणता प्रश्‍न कायमचा सुटला. मग हा राडा नेमका कुणासाठी? याचं उत्तर सत्ताधारी आणि विरोधक या दोहोेंनी जनतेला द्यायलाच हवं.

सध्या समाजमाध्यमांचा चांगलाच बोलबाला आहे. जगात जरा कुठे खट्ट झालं की, त्याची दखल अतिवेगाने या समाजमाध्यमांमध्ये घेतली जाते. अगदी कोणतीही खातरजमा न करता… रावसाहेब दानवेंच्या वक्तव्यानंतरही असंच घडलं. अगदी बघता बघता सोशल मीडियातील सर्वच माध्यमप्रकारांमध्ये साल्या हा हॅशटॅग बनला. विरोधकांनी भाजपसह दानवेंवर चांगलेच तोंडसुख घेतले. या तोंडसुखावर हताश होण्याचं जसं काहीच कारण नाहीय, तसंच यामुळे आनंदून जाण्याचंही काही कारण नाही. कारण असे हॅशटॅग करून संबंधित व्यक्ती बाधित होऊ शकते. मात्र, मूळ परिस्थितीत कोणताही बदल होत नाही. याचं उत्तम उदाहरण म्हणजे, सोशल मीडियात साल्या हा शब्द जेंव्हा ट्रेंड बनत होता, तेव्हाच सोशल मीडियाचा अक्कलहुशारीने वापर करणार्‍यांनी लागलीच दुसरा ट्रेंड सुरू केला. तो ट्रेंड होता नाल्या… कुणी साल्यावर बोलतंय, कुणी नाल्यावर बोलतंय…, अशा पोस्ट सोशल मीडियात झळकू लागल्या. कुणी नाल्यावर बोलतंय, हा टोला होता अर्थातच शिवसेनेला. पावसाळ्यापूर्वी पालिकांच्या अखत्यारीतील नालेसफाई पूर्ण होणं अपेक्षित असतं. मात्र, मुंबईतील मिठी नदीशी जोडलेल्या नाल्यांची सफाई पूर्ण झाली नाही. हा आरोप पालिकेतील सत्ताधारी म्हणून शिवसेना आजही नाकारत आहे, तर त्याच मिठी नदीच्या सफाईकामाची पहाणी केल्यानंतर भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. मिठी नदीच्या सफाईचं काम समाधानकारक झालेले नाही. यामुळे सामान्य जनता आणि भाजप शिवसेनेवर नाराज आहे, असं शेलार यांनी म्हटलं. आशिष शेलार यांच्या नाराजीत एक गोष्ट मजेशीर होती, ती म्हणजे सामान्य जनतेसोबत भाजपही शिवसेनेवर नाराज आहे, असं त्यांचं म्हणणं. सामान्य जनता कायमच सत्ताधार्‍यांवर नाराज असते. कारण त्यांच्या सोयीसुविधांचे प्रश्‍न कोणतंच सरकार पूर्णपणे सोडवत नाही. तसं जर असतं तर मुंबईसारख्या कॉस्मोपॉलिटीन शहरात शौचालयांचा प्रश्‍न गंभीर बनला नसता. राज्यातील महिलांच्या लघवीच्या न्याय्यहक्कासाठी राइट टू पी सारखं अभियान राबवावं लागलंच नसतं… पण शेलारांनी सामान्य जनतेच्या खांद्यावरून प्रतिस्पर्धी (?) शिवसेनेवर अचूक निशाणा साधला.

या सर्व परिस्थितीमुळे बेताल वक्तव्य करणार्‍या पुढार्‍यांना जर वठणीवर आणायचं असेल, तर निवडणुकीत मतदान करताना ही सगळी वक्तव्यं याद करूनच मतदान करावं. जसं, मग धरणात काय मुतायचं? या विधानाबद्दल अजित पवारांना किंमत मोजावी लागली, अगदी तसंच… अन्यथा साल्या ते नाल्या हा वक्तव्यांचा पाऊस असाच बरसत राहील. मात्र, या पावसात सामान्य जनता नि बळीराजा दोघेही कोरडेच राहतील…

राकेश शिर्के- 9867456984