सावकारी कर्जाच्या विळख्यात अडकले लाखो शेतकरी! 

0
एका वर्षात सावकारांनी वाटप केले 1,615 कोटींचे कर्ज
निलेश झालटे,नागपूर-राज्यात शेतकरी सावकारी कर्जाच्या विळख्यात अडकला असल्याची माहिती सरकारने दिलेल्या उत्तरातूनच समोर आली आहे. 2017 साली 12,214 सावकारांनी 10 लाख 95 हजार 701 कर्जदारांना 1,615 कोटींचे कर्ज वितरित केली असल्याची माहिती लेखी उत्तरात समोर आली आहे. हे सगळे सावकार परवानाधारक आहेत. सहकारी बँका, व्यापारी बँकांकडूनही कोट्यवधींचे कर्ज शेतकऱ्यांना वितरित केले आहे. त्यामुळे शेतकरी सावकारांच्या जाळ्यात अडकत चालला आहे हे म्हणणे संयुक्तिक नसल्याचा अजब दावा सहकारमंत्र्यांनी उत्तरात केला आहे.
कर्जमाफी असलेल्या जाचक अटी व नियम शिथिल करण्याबाबत प्रश्न विचारला होता. कर्जमाफीच्या अटी जाचक असल्याने आणि शासनाचे अनुदान वेळेवर मिळत नसल्याने शेतकरी सावकारांकडून कर्ज काढत असल्याचे या प्रश्नात म्हटले आहे. यावर सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले आहे की, राज्यात 31 मार्च 2016 अखेर 12,207 परवानाधारक सावकारांनी 10 लाख 86 हजार 256 शेतकरी व बिगर शेतकरी कर्जदारांना 1,255 कोटींचे कर्ज वाटप केले तर 2017 मध्ये 12,214 सावकारांनी 10 लाख 95 हजार 701 कर्जदारांना 1,615 कोटींचे कर्ज वाटप केले आहे. या तुलनेत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि व्यापारी बँकांनी 2016 मध्ये 58.47 लाख खातेदारांना रब्बी आणि खरीपासाठी 40,581 कोटींचे कर्ज वाटप केले तर 2017 मध्ये 57.8 लाख खातेदारांना दोन्ही हंगामासाठी 42,172 कोटींचे कर्ज दिले आहे. त्यामुळे शेतकरी सावकारांच्या जाळ्यात अडकत चालला आहे हे म्हणणे संयुक्तिक नाही, असे देशमुख यांनी सांगितले आहे.
देशमुख यांनी सांगितले की, महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियमाच्या तरतुदीनुसार सावकारांना परवाने देण्यात येतात. तसेच कायद्याने विहित केलेल्या दरानुसार व्याज आकारणी करणे सावकारांना बंधनकारक आहे. बेकायदेशीर सावकारीबाबत प्राप्त होणाऱ्या तक्रारीबाबत अधिनियमातील तरतुदीनुसार कार्यवाही करण्यात येते, असे देशमुख यांनी उत्तरात म्हटले आहे.