भुसावळ । जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीची रणधुमाळी संपली यात तालुक्यात भाजपाने जिल्हा परिषद गटात आपली एक जागा कायम राखत शिवसेने खाते उघडले असून राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र तीन वरुन एकाच जागेवर समाधान मानावे लागले. तर पंचायत समिती गणात देखील राष्ट्रवादीचे संख्याबळ घटून भाजपाला सर्वाधिक म्हणजेच चार जागांवर विजय मिळाला आहे. तर शिवसेना व राष्ट्रवादीला येथेही प्रत्येकी एक जागा मिळाली. या निवडणूकीत माजी आमदार संतोष चौधरी यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी जोर लावला होता. तर ऐनवेळी उमेदवारी नाकारल्यामुळे नाराज झालेले पंचायत समिती सभापती राजेंद्र चौधरी यांनी देखील बंडाचे निशान उभे करण्याचा प्रयत्न केला मात्र हतनूर- तळवेल गट वगळता त्याचा इतर ठिकाणी काही एक उपयोग झाला नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे चौधरी गट व अंतर्गत बंडाळीवर मात करुन नगरपालिकेपाठोपाठ तालुक्यातील ग्रामीण भागाचे सत्ताकेंद्र समजल्या जाणार्या पंचायत समितीवर भाजपाचे कमळ फुलले असून पुन्हा एकदा आमदार संजय सावकारे यांनी केलेली व्युहरचना व त्यांच्या नेतृत्वावर भाजपा कार्यकर्त्यांचा तसेच सर्वसामान्य जनतेचा विश्वास असल्याचे शिक्केमोर्तब झाले आहे.
साकेगाव – कंडारी गणात दगाबाजीमुळे भाजपचा पराभव
तालुक्यात जिल्हा परिषदेच्या तीन गट तर पंचायत समितीच्या सहा गणासाठी निवडणूक पार पडली. यासाठी भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस यांसह इतरही पक्षांनी आपले उमेदवार उभे केल्यामुळे काही मतदार संघात बहुरंगी तर कुठे तिरंगी लढती पहावयास मिळाल्या. साकेगाव- कंडारी गटात राष्ट्रवादीचे रविंद्र पाटील हे निवडून आले असून त्यांनी भाजपाचे चुडामण भोळे यांना पराभूत केले आहे. या गटात उपसभापती मुरलीधर पाटील यांनी देखील भाजपाकडून उमेदवारीची मागणी केली होती. मात्र त्यांना उमेदवारी न देता त्यांची पत्नी प्रिती पाटील यांना साकेगाव गणातून पंचायत समितीसाठी उमेदवारी देण्यात आली त्यामुळे नाराज झालेल्या पाटील यांनी राष्ट्रवादीशी अंतर्गत जुळवून घेत खडका गावात राष्ट्रवादीला मदत केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच याठिकाणी भाजपा उमेदवाराचा केवळ 313 मतांनी पराभव झाला आहे.
हतनूर गटात सभापतींचा इफेक्ट
हतनूर-तळवेल गटात देखील सभापती राजेंद्र चौधरी यांना कुर्हे गटातून उमेदवारी नाकारल्यामुळे त्यांच्या नाराजीचा प्रभाव येथे दिसून आला त्यामुळे याठिकाणी भाजपा उमेदवार प्रज्ञा सपकाळे यांचा पराभव होऊन शिवसेनेच्या उमेदवार सरला कोळी यांनी विजय मिळविला आहे.
कुर्हे – वराडसीम गटाने राखला मान
कुर्हे-वराडसीम गटात आमदार संजय सावकारे यांच्या वहिणी पल्लवी प्रमोद सावकारे या भाजपाकडून रिंगणात होत्या त्यामुळे याठिकाणी आमदार सावकारेंची प्रतिष्ठा पणाला लागली होती. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार संगिता सपकाळे यांना पराभूत करुन 9 हजाार 204 मते मिळवून दणदणीत विजय मिळविला आहे. त्यामुळे तालुक्यात भाजपाची हि एकमेव जागा तरी जिंकता आली असल्याचे समाधान पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे.
महाजन होणार सभापती?
पंचायत समितीमध्ये भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक चार जागा जिंकल्या यामध्ये साकेगाव गणातून उपसभापती मुरलीधर पाटील यांच्या पत्नी प्रिती पाटील, कुर्हे गणातून सुनिल महाजन, वराडसीम गणातून मनिषा पाटील तर हतनूर गणातून वंदना उन्हाळे या विजयी झाल्या आहेत. त्यामुळे सभापतीपद देखील भाजपाच्या ताब्यात असून यासाठी कुर्हे गणातून विजयी झालेले सुनिल महाजन यांना संधी दिली जाणार असल्याचे समजते. तसेच मुरलीधर पाटील देखील सभापतीपद आपल्या ताब्यात घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे बोलले जात आहे.