सावकारेंच्या पत्राची शिक्षणमंत्र्यांकडून दखल

0

जळगाव । जिल्हा परिषदेच्या शाळांना पुरविला जाणारा पोषण आहार हा निकृष्ट दर्जाचा असल्याचे भाजपाच्या भुसावळ तालुक्यातील कुर्‍हेसीम गटातील जिल्हा परिषद सदस्या पल्लवी सावकारे यांनी उघड केले आहे. सावकारे यांनी याबाबत 2 रोजी मुख्यमंत्र्यांसह शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे ई-मेलद्वारे तक्रार केली होती. या तक्रारीची शिक्षणमंत्र्यांनी दखल घेवून कार्यवाहीचे आदेश संबंधीत अधिकार्‍यांना देत असल्याचे ई-मेलद्वारे कळविले आहे. भुसावळ तालुक्यातील शाळांमध्ये जिल्हा परिषदेच्या सदस्या पल्लवी सावकारे यांनी भेटी दिला होत्या. आहार हा निकृष्ट दर्जाचा असल्याचे दिसून आले होते.

पल्लवी सावकारे यांनी सीईओ व शिक्षणाधिकारी यांच्या तक्रार करून शाळांमधील पोषण आहाराचे नमुने देवून पुरवठादारावर कारवाई करावी अशी मागणी केली होती. सीईओ यांनी याची दखल घेवून पुरवठादाराचे गोडावून तपासण्याच्या सुचना देवून नमुने तपासणीसाठी एफडीए नाशिक यांच्याकडे पाठविण्यात आले आहे.सावकारे यांनी मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांच्याकडे तक्रार केली होती. ई-मेलची दखल घेत शिक्षणमंत्र्यांनी कार्यवाहीसाठी संबंधित अधिकार्‍यांना पाठविण्यात आले असल्याचे सांगितले आहे, मात्र शिक्षण विभागाशी संपर्क साधला असता चौकशी संबंधीचे कोणतेही आदेश बुधवारी 5 पर्यत प्राप्त झालेले नव्हते.