संशयीत ताब्यात ; पसार चार आरोपींचा शोध सुरू
यावल- तालुक्यातील सावखेडासीम गावातून 27 मार्च रोजी अपहरण करण्यात आलेली 17 वर्षीय अल्पवयीन तरुणी चंद्रपूर जिल्ह्यातील मुल तालुक्यात सापडली असून तिला फूस लावून पळवून नेणार्या एका संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी आधीच पाच जणांविरोधात गुन्हा दाखल असून अन्य पसार आरोपींचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.
मूल गावातून आरोपीच्या आवळल्या मुसक्या
सावखेडासीम येथील 17 वर्षीय मुलगी 27 मार्च रोजी घरी एकटी असताना गावातीलच प्रशांत उर्फ समाधान अशोक पाटील, अशोक ओंकार पाटील, संगीताबाई अशोक पाटील, मीनाबाई जगदीश पाटील व समाधान पंडित पाटील या सर्वांनी तिला फूस लावून पळवून नेत तिचे अपहरण केले होते. पीडित मुलीच्या पालकांनी या प्रकरणी यावल पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी राज्यभरात विविध ठिकाणी त्यांचा शोध घेतला मात्र संशयीत व अल्पवयीन मुलगी मिळून आली नाही. तेव्हा मुख्य संशयिताच्या सर्व नातलगांकडे चौकशी सुरू करण्यात आली. संशयीत चंद्रपूर जिल्ह्यातील मुल तालुक्यात असल्याचे आढळल्यानंतर शनिवारी पोलीस निरीक्षक डी. के. परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश तांदळे, हवालदार संजीव चौधरी, राहुल चौधरी व एक महिला कर्मचार्याने मूल शहरातून आरोपीच्या मुसक्या आवळल्या. संशयीत हा अल्पवयीन मुलीसह एका भाड्याच्या घरात आढळून आला. रविवारी रात्री उशीरा त्यास ताब्यात घेतल्यानंतर सोेमवारी दुपारी पोलिसांचे पथक यावलला परतले. दरम्यान, अपहरण केलेल्या अल्पवयीन तरुणीची वैद्यकीय तपासणी केली जाईल तसेच या गुन्ह्यातील इतर संशयितांचा शोध घेत घेतला जात आहे. आरोपीला मंगळवारी कोर्टात हजर करण्यात येणार असल्याचे तपासी अधिकारी तथा सहाय्यक निरीक्षक योगेश तांदळे यांनी सांगितले.