सावखेडासीमला दिराणीने वाचवले जेठाणीचे प्राण

0

अंगावर कोसळली वीज तार ; दूर लोटल्याने टळली दुर्घटना

यावल- तालुक्यातील सावखेडासीम येथे शनिवारी 30 रोजी मारोती मंदीरासमोरील वीज वाहक तार अचानक तुटून पडली. याच दरम्यान शौचास जात असलेल्या जेठाणीच्या अंगावर वीज तार पडल्याचे लक्षात येताच दिरानीने समयसुचकता दाखवत जेठाणीला धक्का देवून दुर केल्याने जेठाणीचे प्राण वाचले. या घटनेत जेठाणी किरकोळ जख्मी झाली असून त्यांना रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

दिराणीच्या समय सूचकतेने वाचले प्राण
सावखेडासीम येथील ममताज तडवी ह्या आपल्या दिराणी उषा तडवीसह सकाळी सहा वाजेच्या सुमारास शौचास जात असतांना मारोती मंदीरासमोरील वीज वाहक तार अचानक त्यांच्या अंगावर पडली. ही घटना उषा तडवी यांच्या लक्षात येताच त्यांनी समयसुचकता दाखवत जेठाणी ममताज तडवी यांना दुर ढकलल्याने मुमताज तडवी यांना वीज वाहक तारांचा स्पर्श होवून मानेवर दुखापत होवून अंगावरील कपडे किरकोळ स्वरूपात जळाले. यामुळे जखमी झालेल्या मुमताज यांना उपचारार्थ रूग्णालयात दाखल करण्यात आले. दिराणीने दाखवलेल्या समयसुचकतेमूळे जेठाणीचे प्राण वाचल्याने उषा तडवी यांचे कौतुक होत आहे.

जीर्ण वीजवाहक तारा बदलवण्याची मागणी
गावातील अनेक वीज वाहक तारा जीर्ण झालेल्या असून गावातील नागरीकांच्या जिवीतास धोका निर्माण झाला असून जीर्ण झालेल्या वीज वाहक तारा त्वरीत बदलवण्याची मागणी ग्रामपंचायतीने वीज वितरण कंपनीकडे केली आहे मात्र वीज वितरण कंपनीचे दुर्लक्ष होत असल्याचे सरपंच साकीर तडवी यांनी सांगितले.