सावखेडासीम भागात बिबट्याने फस्त केली बकरी

यावल : नागादेवी वनक्षेत्रात बिबट्याने बकरीला फस्त केल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली. यावल तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या नागादेवी वनक्षेत्रातील जंगलात अनिल विश्राम पाटील यांच्या (मालकी गट क्रमांक 191) शेतात सालदारी मजुर म्हणून काम करणारा लालसिंग बारेला यांच्या घरासमोरील गोठ्यात बांधलेल्या बकरीवर बुधवार, 12 जुलैच्या मध्यरात्री बिबट्याने हल्ला करून तिला ओढून जंगलात घेवून फस्त केले. या घटनेमुळे लालसिंग बारेला यांच्या कुटुंबात भीती पसरली आहे.

वनाधिकार्‍यांची घटनास्थळी धाव
या घटनेचे वृत्त कळताच पश्चिम क्षेत्राचे वनपरीक्षेत्र अधिकारी एस.टी.भिलावे यांनी तत्काळ या घटनेची चौकशी करण्याची सूचना दिली. पश्चिम वनक्षेत्राचे वनसंरक्षक बी.वाय.नलावडे, वनपाल आर.बी.पाटील, वनपाल आर.एस.शिंदे यांनी नागादेवी जंगलात जावून प्रत्यक्ष घटनास्थळी पंचनामा केला तसेच बिबट्याच्या पायाचे ठसे घेतल्याने या क्षेत्रात तीन वर्ष वयाच्या बिबट्याचा वावर असल्याचे सिद्ध झाले आहे. या घटनेनंतर या क्षेत्रातील शेती करणारे शेतकरी व शेतमजुर यांनी एकट्या व्यक्तिने जंगलात जावू नये, असे आवाहन पश्चिम क्षेत्राचे वनपरीक्षेत्र अधिकारी एस.टी.भिलावे यांनी ग्रामस्थांना केले आहे.