सावखेडा खु. येथील महिलेचा डोक्यावर फांदी पडल्याने मृत्यू

0

पाचोरा – सावखेडा खु ता. पाचोरा येथील ४५ वर्षे वयाची महीला स्वयंपाक करण्यासाठी लागणारे सरपण तोडण्यासाठी जवळील चिंचपूरा येथील गायराण जंगलात गेली होती. सरपण तोडीत असतांना तिच्या डोक्यावर सुकलेल्या झाडाची फांदी पडल्याने महीलेचा जागेवरच मृत्यू झाला.
सावखेडा खु येथील दिलशानबी मानखा तडवी ही दि.२ रोजी सकाळी ९ वाजता गावातील महीलांसोबत सरपण जमा करण्यासाठी गावापासुन दिड किलोमीटर अंतरावर असलेल्या चिंचपूरा येथील गायरान जंगलात गेल्या होत्या. जंगलात सुकलेले झाड आढळून आल्याने त्या झाडाची फांदी कुर्‍हाडीने तोडत असतांना दिलशानबी मानखा तडवी यांच्या डोक्यावर फांदी पडल्याने त्या जागेवरच मृत पावल्या. सोबत असलेल्या महीलांनी दिलशानबी तडवी जागेवर कोसळल्याचे लक्षात येताच धावत जावून आरडाओरड केली. जवळच जेसीबीचे काम सुरू असल्याने त्या इसमांनी प्रथम महिलेस उपचारासाठी पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी महीला मृत असल्याचे सांगितले. मयत महीलेचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमित साळुंखे यांनी केले. तीच्या पश्‍चात पती, तीन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. घटनेप्रकरणी पिंपळगाव हरे पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करुन सहाय्यक पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार हरीभाऊ पवार हे करीत आहेत.