सावत्र वडिलांच्याच सेक्स स्कॅण्डलने सांगवी हादरले!

0

पिंपरी-चिंचवड : सावत्र बापानेच आपल्या तीन अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार सांगवीत उघडकीस आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या नराधमाने या मुलींची अर्धनग्न अवस्थेत अश्‍लील छायाचित्रे काढली. ही छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देत तो या मुलींवर लैंगिक अत्याचार करत होता, अशी बाबही या मुलींच्या चौकशीतून पुढे आली आहे. या प्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले असून, पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. गेल्या दोन वर्षांपासून हे लैंगिक अत्याचार सुरु होते, असेही पोलिसांनी सांगितले.

आधी दोघींवर अन् मग लहानगीवर पडली वाईट नजर
पोलिसांच्या माहितीनुसार, तीनही मुलींच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या आईने 2012 मध्ये संबंधित आरोपीशी पुनर्विवाह केला होता. मुलींची आई एका कंपनीत कामगार असून, ती कामाला गेली, की घरी असलेला हा सावत्र बाप सुरुवातीला दोन मुलींसोबत अश्‍लील चाळे करत होता. या दोनपैकी सर्वात मोठ्या मुलीचे वय 15 वर्षे असून, दुसरी तिच्यापेक्षा दीड वर्षाने लहान आहे. तर तिसरी तिच्यापेक्षा आणखी वर्ष-दीड वर्षाने लहान आहे. दोन मुलींना भाजीपाला आणण्यासाठी बाहेर पाठवून त्याने 15 वर्षीय मुलीसोबत लैंगिक अत्याचार केला तसेच तिचे अर्धनग्न अवस्थेत छायाचित्रेही काढली होती. ही छायाचित्रे व्हायरल करण्याची व जीवे मारण्याची धमकी देऊन तो या अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करत होता. मोठ्या मुलीनंतर त्याने दुसर्‍या क्रमांकाच्या मुलीसोबतही असाच प्रकार केला व त्याला त्याची चटकच लागली. या दोन्ही मुलींचे लैंगिक शोषण केल्यानंतर या नराधमाची नजर तिसर्‍या मुलीवर पडली. त्याने तिच्याशीही अश्‍लील चाळे करण्याचा प्रयत्न केला असता, तिने ही बाब आपल्या बहिणींना सांगितली. त्यामुळे या दररोजच्या अन्यायाला कंटाळलेल्या या मुलींनी हा धक्कादायक प्रकार आपल्या आईला सांगितला. हा प्रकार ऐकून तर त्यांच्या आईला मोठा मानसिक धक्का बसला होता.

मुलींच्या आईला मानसिक धक्का
मानसिक धक्क्यातून सावरल्यानंतर मुलींच्या आईने या नराधमाला समजावूनही सांगितले, तरी त्याच्याकडून मुलींचे लैंगिक शोषण सुरुच होते. त्यामुळे या महिलेने सांगवी पोलिस ठाणे गाठून पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पुनर्विवाह करताना या तीनही मुलींना स्वतःच्या मुलीसारखे सांभाळण्याची जबाबदारी या नराधमाने घेतली होती. परंतु, बाप-लेकीच्या नात्याला काळिमा फासून त्याने या मुलींचे लैंगिक शोषण केल्याने सांगवी गावात एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी गुन्हे दाखल करून या नराधमाच्या मुसक्या आवळल्याची माहितीही पोलिसांनी दिली. पुढील तपास पोलिस करत आहेत.