सावदा नगरपालिकेवर दिव्यांग बांधवांचा मोर्चा

0

विविध मागण्यांसंदर्भात पालिका प्रशासनाला निवेदन सादर

सावदा- विविध मागण्यांसंदर्भात शहरातील दिव्यांग सेनेतर्फे शुक्रवारी सकाळी पालिकेवर मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन देण्यात आले. मोर्चाची सुरवात सावदा बसस्थानकाजवळील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून झाली. शहरातील मुख्य मार्गावरून मोर्चा नगरपालिकेजवळ आल्यानंतर मोर्चेकर्‍यांनी जोरदार घोषणाबाजी केल्याने शहर दणाणले.

मुख्याधिकार्‍यांनी स्वीकारले निवेदन
नगरपालिकेजवळ मोर्चेकरी आल्यावर मुख्याधिकारी सौरभ जोशी यांनी स्वतः बाहेर येऊन त्यांचे निवेदन स्वीकारले व आपल्या मागण्या पूर्ण करण्याचा सर्व प्रयत्न करू, असे आश्वासन मोर्चेकरी दिव्यांग बांधवांना यावेळी दिले. निवेदनाचा आशय असा की, सावदा नगरपालिका हद्दीत राहत असलेल्या दिव्यांगांच्या घरी जाऊन सर्वेक्षण करणे, नगरपालिका आवारात दिव्यांग कक्ष उभारणे, सावदा नगरपालिका स्व-उत्पन्नातून शासन निर्णयानुसार पाच टक्के निधीचा वापर करण्यात यावा, पालिकेच्या व्यापारी संकुलात दिव्यांग व्यक्तीकरीता गाळा उपलब्ध करून द्यावा, दिव्यांगाना घरपट्टी पाणीपट्टीत 50 टक्के सूट द्यावी, दिव्यांग व्यक्तींच्या उदरनिर्वाहा करीता निधी थेट लाभार्थींच्या बँक खात्यात जमा करण्यात यावा, नवीन घरकुल तसेच दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, वैद्यकीय खर्चाकरीता निधी उपलब्ध करून द्यावा, बचत गटासाठी अर्थसहाय्य देण्यात यावे यासह सुमारे 15 मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत. निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, जळगाव, दिव्यांग राष्ट्रीय अध्यक्ष प्रसाद साळवी यांना पाठविण्यात आल्या आहेत.

यांच्या निवेदनावर स्वाक्षर्‍या
निवेदनावर दिव्यांग सेना जिल्हाध्यक्ष अक्षय महाजन, सावदा शहराध्यक्ष विशाल कासार, उपाध्यक्ष तेजस वंजारी, ग्रामीण अध्यक्ष दिलीप जैन, महिला प्रसिद्धी प्रमुख संगीता गडे, नंदलाल कुलथे, नितीन महाजन, नाना मोची, ललित वाघुळदे, मुन्ना चौधरी, दीपक बारी, ब्रिजलाल पाटील, महेश महाजन, संजय बुवा, विजय बारी यांच्यासह असंख्य दिव्यांग बांधवांच्या स्वाक्षर्‍या आहेत.