काही विषयांवर विरोधकांची हरकत; राजेश वानखेडेंच्या अभिनंदनाचा ठराव
सावदा । पालिकेची सर्वसाधारण सभा शुक्रवार, 8 रोजी सकाळी 11 वाजता पालिकेच्या सभागृहात झाली. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा अनिता येवले होत्या. सभेत 13 विषयांना मंजुरी देण्यात आली तर काही विषयांवर विरोधकांनी हरकत नोंदवली. जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीत विजयी झालेल्या राजेश वानखेडे यांच्या अभिनंदनाचा ठराव करून त्यांचा सत्कार करण्यात आला.
अनेक विषयांना विरोधकांची हरकत
स्वामीनारायण नगरातील गटारी झाल्याचे राजेंद्र चौधरी यांनी सांगितल्यानंतर मुख्याधिकार्यांनी काही बाकी असल्याचे सांगितले तर चौधरी यांनी मागे शहरात 21 फुटाचा रस्ता 11 फुटाचा करून 21 फुटाचे बिल काढल्याचा आरोप पालिकेवर झाल्याने आता तसे होवू नये, अशी अपेक्षा व्यक्त केली. राजेश वानखेडे यांनी शहरात एल.ई.डी लाईटबाबत निविदा निघाली का ? अशी विचारणा केली त्यावेळी निविदेस वाढ देण्यात आल्याचे सांगितले. वानखेडे यांनी एल.ई.डी लाईट डी.एस.आर.कमी झाला असून त्यात 40 टक्के कपात करण्यात आल्याने तसेच सदर काम शासनाने दिलेल्या एजन्सी कडून केल्यास काम थेट होईल निविदा काढावी लागणार नाही व यात पालिकेची पैश्याची 40 टक्के बचत होईल, असे सुचविले. भाजपा गटनेते अजय भारंबे यानी आमदार एकनाथराव खडसे यांच्यावर खोटा गुन्हा दाखल झाल्याने निषेधाचा ठराव मांडला. उपनगराध्यक्षा नंदा लोखंडे, रॉ.का. गटनेते फिरोज खान पठाण यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होत्या.