सावदा मंडळाधिकारी बी.एम.पवार अखेर निलंबीत

सावदा : सावदा मंडळ अधिकारी बी.एम.पवार यांना उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी यांनी शुक्रवारी निलंबीत केल्याने महसूल वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. सोशल मीडियात पैसे घेतांनाची क्लिप व्हायरल झाल्यामुळे पवार हे चर्चेत आले होते. दरम्यान, निलंबन काळात पवार यांना जळगाव तहसील मुख्यालय देण्यात आले असून तहसीलदारांच्या परवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये, असे उपजिल्हाधिकार्‍यांनी आदेशात म्हटले आहे.

क्लीपमुळे मंडळाधिकारी पवार चर्चेत
अवैधरीत्या वाळू वाहतूक करणार्‍यांकडून पवार हे पैसे स्वीकारत असल्याची क्लीप सोशल मिडीयात व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली होती. या संदर्भात शांताराम देवसिंग पाटील (लुमखेडा) याबाबत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे तक्रार केली होती. पवार यांनी वाळू वाहतूक होवू देण्यासाठी 50 हजारांची लाच मागितली व त्या पोटी लाच स्वरूपात 10 हजार रुपये स्वीकारल्याचे त्यात नमूद करण्यात आले होते. फैजपूर प्रांताधिकारी कैलास कडलग यांनी या तक्रारीची चौकशी करीत जिल्हाधिकार्‍यांकडे अहवाल सादर केल्यानंतर शुक्रवारी पवार यांच्या निलंबनाचे आदेश निघाल्यानंतर महसूल वर्तुळात खळबळ उडाली.