सावदा। शहरात अवैध दारुबंदीचे आश्वासन देऊनही आंबेडकर नगर परिसरात रात्रीच्या वेळेस सर्रास दारुविक्री सुरु असल्याचे पाहून संतप्त झालेल्या महिलांनी या दुकानांवर धाड टाकून येथील दारुचे साहित्य व विक्रेत्यांना पकडून पोलीसांच्या स्वाधीन केले. शहरात चार ते पाच दिवसापूर्वी दारु पिण्याचे कारणावरुन येथील आंबेडकर नगर भागतील एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती यामागे दारु हे कारण असल्याचे समजल्यावर येथील महिला लागलीच पोलीस स्टेशनवर धडकल्या असता, पोलिसांनी शहरात दारु बंद आहे कोठे सुरु असल्यास कारवाई करू असे आश्वासन दिले होते.
पोलिसांकडून कारवाई न झाल्याने संताप
या घटनेनंतर देखील रात्री आंबेडकर नगर तसेच शहरातील इतर भागात दारू विक्री सरुच होती. हि बाब महिलांच्या लक्षात आल्यावर त्यांचा संताप अनावर झाला त्यांनी एकत्र येत तेथील दारुविक्री करणार्या तीन वेगवेगळ्या ठिकाणी धाड टाकली व तेथून दारु व विक्रेत्यांना थेट पोलीस स्टेशनला आणून पोलिसांच्या ताब्यात दिले. काही युवक थेट बस स्टँड परिसरात ज्या ठिकाणी दारुविक्री करीत होते अशा ठकाणी तसेच हॉटेलवर महिला धडकल्या. मात्र याची कुणकुण लागताच सदर दारु विक्रेते आधीच पसार झाले होते, तर या युवकांनी हॉटेल मध्ये जाऊन पाहणी देखील केली, याचवेळी समोरील सोमेश्वर नगर भागात जाणार्या रस्त्यालगत एक जण दारू विक्री करत असल्याचे समजताच त्यांनी तिकडे मोर्चा वळविला. सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांनी सावदा बसस्टॅण्डवर जाऊन तेथे दारु बंद करण्याचे आश्वासन दिले. दरम्यान दारु विक्री करणार्या दोन पुरुष व एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांचे कडील माल ताब्यात घेण्यात आला आहे.