सावदा : सावदा येथून जवळच असलेल्या सावदा रेल्वे स्टेशन जवळ असलेल्या एका शीतगृहावर शुक्रवार, 24 रात्री वॉचमनला अज्ञातांनी मारहाण करीत उभ्या असलेल्या दोन वाहनांसह इतर साहित्याला पेटवून लाखोंचे नुकसान केल्याची घटना घडली. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.
आगीत दोन लाख 28 हजारांचे नुकसान
सावदा स्टेशनजवळ सावदा रोडवर लक्ष्मण काशिनाथ शिंदे यांचे केळी साठवण करण्याचे शीतगृह (कोल्ड स्टोरेज) असून तेथे त्यांची एक कार व एक दुचाकी तसेच इतर साहित्य बाहेर ठेवण्यात आले होते शिवाय वॉचमन म्हणून बाबुभाई गुगाभाई वाघारी हे कामाला आहेत. शुक्रवारी रात्री 11.15 वाजेदरम्यान अज्ञात 4 ते 5 आरोपींनी येथे वॉचमनला मारहाण केली तसेच तेथे उभ्या असलेल्या स्विफ्ट डिझायर तसेच एक मोटर सायकल, केळी भरावयाचे कॅरेट तसेच इतर साहित्याला ज्वलनशील पदार्थाने आग लाऊन दिली. या घटनेनंतर वॉचमनने गावाकडे पळ काढला व शिंदे कुटुंबियांना माहिती दिल्यानंतर त्यांनी धाव घेत असली असता संशयीत मात्र पसार होण्यात यशस्वी झाले. शिंदे यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला पण आग मोठी असल्याने सावदा नगरपालिका अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. या आगीत दोन लाख रुपये किंमतीचे कार, 25 हजार रुपये किंमतीची होंडा कंपनीची मोटर सायकल, तीन हजारांचे प्लॅस्टीक कॅरेट मिळून दोन लाख 28 हजार रुपये किमतीचा सामान जळाला. याबाबत लक्ष्मण एकनाथ शिंदे यांनी सावदा पोलिसात फिर्याद दिल्यावरून सावदा पोलिसात अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक निरीखक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार पांडुरंग सपकाळे, युसूफ तडवी व सहकारी करीत आहेत.