सावदा रेल्वे स्थानकावर तपासणी मोहिम ; तीन लाख 20 हजारांचा दंड वसुल

0

604 प्रवाशांवर कारवाई ; अचानक मोहिमेमुळे प्रवाशांमध्ये खळबळ

भुसावळ- फुकट्या प्रवाशांवर कारवाईच्या मोहिमेंतर्गत सावदा रेल्वे स्थानकावर बुधवारी दिवसभरात राबवण्यात आलेल्या तिकीट तपासणी मोहिमेत 604 प्रवाशांकडून तीन लाख 20 हजार 420 रुपये दंड वसूल करण्यात आला. या कारवाईने फुकट्या प्रवाशांमध्ये खळबळ उडाली. सकाळी सात ते दुपारी तीन वाजेपर्यत 17 गाड्या थांबवून तिकीट न काढणार्‍या फुकट्या प्रवाशांसह जनरल तिकीट घेऊन आरक्षण डब्यातून प्रवास करणार्‍या प्रवाशांसह अनधिकृत खाद्यपदार्थ विक्रेयांवर कारवाई करण्यात आली.

34 तिकीट निरीक्षकांनी राबवली मोहिम
उन्हाळी सुट्या, लग्नसराईमुळे रेल्वे गाड्यांना तुफान गर्दी होत आहे. या गर्दीचा फायदा घेत अनेक फुकटे प्रवासी तिकीट न काढता प्रवास करतात. काही जनरल तिकीट काढून आरक्षित किंवा एसी बोगीत बसून प्रवास करतात. यामुळे रेल्वेचे उत्पन्न बुडते. शिवाय इतर प्रवाशांना त्रास होतो. या प्रकारावर पायबंद घालण्यासाठी रेल्वेने विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे. बुधवारी वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक आर.के.शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली व सहययक वाणिज्य प्रबंधक अजयकुमार यांच्या उपस्थितीत बुधवारी सकाळी सात ते दुपारी तीन वाजेपर्यत अचानक 34 तिकीट निरीक्षक, 12 आरपीएफ जवान आणि अधिकार्‍यांचे पथक स्वतंत्र बसद्वारे सावदा रेल्वे स्थानकावर पोहोचले. या पथकाने सुपरफास्टसह अन्य गाड्या थांबवून तिकीट तपासणी करण्यात आल्याने फुकट्या प्रवाशांची धांदल उडाली. तिकीट तपासणीसांना चुकवून पळण्याचा प्रयत्न अनेकांनी केला मात्र आरपीएफ गाडीच्या दोन्ही बाजूने उभे असल्याने त्यांना पकडून तिकीट निरीक्षकांच्या हवाली करण्यात आले. अचानक राबवण्यात आलेल्या या मोहिमेमुळे प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली.

या गाड्यांची झाली तपासणी
सावदा स्थानकावर इटारसी-भुसावळ, गोवा, गोदान, काशी, भालपूर, गोरखपूर, पुष्पक, कनार्टक , जनता, कुशीनगर, पुणे-लखनऊ, पठाणकोट, महानगरी, वाराणसी सुपरफास्ट, भुसावळ-कटनी पॅसेंजर, साकेत एक्स्प्रेस या गाड्या थांबवून एन.पी.पवार, ए.आर.सुरवाडकर, शेख सत्तार, एल.आर.स्वामी, के.के.तांती, राजय वर्मा, एन.पी.अहिरवार, वे.दी.पाठक, व्ही.के.संचन, हेमंत सावकारे आदी तिकीट निरीक्षकांच्या पथकाने तपासणी केली.