सावदा शहरातील अनेक पतसंस्था बंद : प्रशासकांचे होतेय दुर्लक्ष

0

कार्यालये बंद असल्याने ठेवीदार संभ्रमात

सावदा- शहरात किमान 40 पतसंस्थाचे कार्य सुरू होते मात्र सन 2007 नंतर यातील बहुतांश संस्था अडचणीत आल्या असून ठेवीदारांना ठेवी मिळत नसल्याने यातील अनेक संस्थाचालकांवर गुन्हे दाखल झाले आहेत तसेच अनेक पतसंस्थांवर प्रशासक नेमण्यात आल्याने ठेवीदारांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या मात्र पतसंस्थांवर प्रशासक नेमून देखील ठेवी परत मिळत नसल्याने ठेवीदार हताश झाले आहेत.

ठेवीदारांच्या ठेवी अडकल्या
अवघ्या 20 ते 25 हजार लोकवस्ती असलेल्या सावदा शहराची राज्यभरात पतसंस्थाचे शहर म्हणून ओळख निर्माण झाली होती मात्र 10 वर्षापूर्वी पतसंस्था अडचणीत आल्याने अनेक ठेवीदारांच्या ठेवी पतसंस्थेत अडकून पडल्या आहेत. यामुळे लेखा परीक्षकांच्या तक्रारीवरून अनेक पतसंस्था चालकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. यामुळे ठेवीदारांच्या मागणीनुसार शासनाने पतसंस्थांवर प्रशासकांची नेमणूक केल्याने कर्जदारांवर कार्यवाही होऊन ठेवीदारांच्या ठेवी परत मिळतील, अशा आशा पल्लवीत झाल्या होत्या मात्र प्रशासकाचे कर्जवसुलीकडे दुर्लक्ष होत असल्याने ठेवीदारांच्या आशा धुसर होत आहेत.

प्रशासकाचे दुर्लक्ष होत असल्याने नाराजी
शासनाने इतर तालुक्यातील प्रशासकांची पतसंस्थावर नियुक्ती केली असून प्रशासकांना पतसंस्थांचा कारभार हाताळण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही तसेच प्रशासक पतसंस्थावर मोजकीच हजेरी लावत असल्याने ठेवीदारांच्या अडचणीत भर पडत आहे. यामुळे तालुक्यातील स्थानिक प्रशासक नेमावा, अशी मागणी ठेवीदारांकडून होत आहे. याबाबतचे निवेदन उपविभागीय अधिकारी, फैजपूर यांना देण्यात आले मात्र या निवेदनाची अद्यापही दखल घेण्यात आली नसल्याने ठेवीदारांमध्ये संताप व्यक्त होत आहे.