Six vehicles vandalized after objectionable post in Sawada : Crime against mob; Arrest of the accused सावदा : शहरातील एका तरुणाने इन्स्टाग्राम या सोशल मिडीया साईटवर एका समाजाबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद शहरात उमटले. संतप्त जमावाने शनिवारी रात्री साडेनऊ वाजता सावदा पोलिस ठाणे गाठून दोषीवर कारवाईची मागणी केली तर पोलिसांनी कारवाईचे आश्वासन देत जमावाला पांगवल्यानंतर संतप्त जमावाने रस्त्यावर उभ्या असलेल्या सहा वाहनांची तोडफोड केल्याने शहरात प्रचंड तणाव पसरला. सावदा पोलिसांनी तातडीने गावात कुमक तैनात करीत परीस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी जमावाविरोधात तसेच आक्षेपार्ह पोस्ट टाकणार्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल
सावदा पोलिस ठाण्याचे कॉन्स्टेबल यशवंत टहाकळे यांनी या प्रकरणी फिर्याद दिल्यानुसार, सैय्यद असलम सैय्यद लाल, शेख साबीर शेख खलील उर्फ अल्लारख्खा, शेख समीर शेख रफीक, शेख वाजीद शेख साबीर, फारुक हाफीज पहेलवान, हसन मुस्तफा वेल्डींगवाला, बबलू खाटीक, शेख सुलतान शेख उस्मान, शेख फरदीन शेख इकबाल तसेच त्यांच्या सोबतच्या 30 ते 35 अनोळखींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, सैय्यद असलम सैय्यद लाल याने जमावाला चिथावणी देवून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान घडवून आणल्याचा आरोप आहे.
सहा वाहनांचे नुकसान
सावदा पोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर एकाने जमावाला चिथावणी दिल्यानंतर संतप्त जमावाने गांधी चौक व चांदणी चौक भागातील इंडीगो (एम.एच.19 ए.एक्स.7282) चा समोरील काच तसेच सिल्व्हर रंगांची सॅन्ट्रो कार (एम.एच.02 बी.जी.2177) चा समोरील व उजव्या बाजुचा समोरील काच, पांढर्या रंगाची मारोती 800 कार (एम.एच.15 एफ.7253) चा उजव्या बाजुचा मागील काच, पांढर्या रंगांची मारोती ओमनी कार (एम.एच.19 बी.जे.0691) चा डाव्या बाजूचा पुढील दरवाजा वाकवला, लाल रंगांची बजाज मोटारसायकल (एम.एच.19 सी.एच.6983) चे समोरील चाक वाकवले व इंडीकेटर तोडुन नुकसान तसेच पांढरे रंगांची टाटा इंडीगो कार (एम.एच.19 एई 4446) हिचा उजव्या बाजूचा दरवाजा वाकवत साईड मिरर तोडफोड करीत नुकसान केले.
तीन संशयीत ताब्यात : दोन गुन्हे दाखल
या प्रकाराची माहिती मिळताच सावदा पोलीस स्थानकाचे एपीआय देविदास इंगोले व सहकार्यांनी यांनी घटनास्थळी धाव घेतली. जिल्हा मुख्यालयातून अतिरिक्त कुमक मागवून परीस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. दरम्यान, आक्षेपार्ह पोस्ट टाकणार्या साहिल राजू भंगाळे (गवतबाजार, सावदा) या तरुणाविरोधात गुलाम फरीद शेख मंजूर (38) यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास ताब्यात घेण्यात आले असून तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणार्या जमावाविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन संशयीतांना ताब्यात घेण्यात आले आहे. सावदा शहरातील स्थिती नियंत्रणात असून कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.