सावदा । स्वच्छ आणि सुंदर शहर अशी जिल्हाभरात सावद्याची ओळख आहे. मात्र, शहरातील अनेक भागांमध्ये सध्या बंद पथदिव्यांची समस्या कायम आहे. त्यामुळे शहरातील बहुतांश भागात काळोख निर्माण होऊन नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. ही समस्या सोडवण्याबाबत नागरिकांनी पालिकेककडे तक्रारी केल्या आहेत. मात्र, पालिकेचे दूर्लक्ष झाल्याने जाणकार नागरिकांच्या सोशल मीडियावर बोलक्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
पालिका प्रशासनाविषयी नागरिकांमध्ये रोष
पथदिव्यांच्या समस्येमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. पथदिव्यांअभावी शहरातील अनेक रस्त्यांवर रात्रीच्या वेळेस काळोख निर्माण होत असून रस्त्यावरुन महिला आणि बालके सायंकळी बाहेर पडू शकत नसल्याची स्थिती आहे. तसेच या अंधाराचा गैरफायदा घेऊन चोरटे आपला हेतू साध्य करीत असतात. नगरपालिकेजवळील कासवेकर वाडा, डेली भाजी मार्केट या भागात ही समस्या अधिक आहे. याबाबत पालिकेकडे तक्रार अर्ज करण्यात आले आहेत. मात्र, पालिकेने या अर्जांना केराची टोपली दाखवली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये पालिका प्रशासनाविषयी तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.