सावद्यातील दफनभूमीचा प्रश्न आरक्षणामुळे तहकूब

0

पालिका विशेष सभेत घेणार निर्णय ; सर्वसाधारण सभेत 23 विषयांना मंजुरी

सावदा- नगरपालिकेच्या बुधवारी झालेल्या सभेत हिंदू दफनभूमीच्या विषयावर सुमारे पावणेतीन तास चर्चा झाल्यानंतर पालिकेंतर्गंत असलेल्या या जागेवर आरक्षण असल्याने तूर्त हा विषय तहकूब ठेवण्याचा निर्णय झाला तर अन्य 23 विषयांना सभागृहाने मंजुरी दिली. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा अनिता येवले होते.

दफनभूमीच्या विषयावर पावणेतीन तास झडती चर्चा
सत्ताधारी गटाच्या रंजना भारंबे, करुणा पाटील यांनी गट नंबर 8 मध्ये दफनभूमीला जागा देण्याचा ठराव करावा, अशी मागणी केली. नगरसेविका शबाना तडवी यांनी तडवी व भिल्ल समाजाचा गट नं.आठमध्ये दफनभूमीसाठी विचार करावा, असा मुद्दा मांडला. राजेश वानखेडे व राजेंद्र चौधरी, फिरोजखान पठाण यांनी दफनभूमीसाठी जागा देण्याची मागणी केली मात्र पालिका मालकीच्या जागेवर गट नं.पाच व आठ यावर पूर्वीचे आरक्षण आहे. पूर्वी या जागेवर गट क्रमांक आठमध्ये कोष्टी समाजाला दफनभूमीसाठी जागा देण्याचा ठराव झाला होता मात्र या जागेवर आरक्षण असल्याने शासनाने हा ठराव रद्द केला होता. आता पुन्हा याच ठिकाणी दफनभूमीला जागा देण्याचा ठराव केल्यास तो पुन्हा रद्द होऊ शकतो. त्यामुळे जेथे आरक्षण नाही, ती जागा देऊन प्रश्न निकाली काढावा, असा मुद्दा मांडण्यात आला. विरोधी गटनेते फिरोजखान यांनीही दोन्ही समाजाची बैठक घेऊन प्रश्न सोडवण्याची सूचना केली.

23 विषयांना सभागृहाची मंजुरी
सभेत पेव्हर व्लॉक बसवणे, कॉक्रिटीकरण, गटारी , स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मारकाचे स्थलांतर, संभाजी मार्केटमधील गळ्यांचा लिलाव करणे, स्वछ महाराष्ट्र अभियान अंतर्गत स्टार रेटिंग मानांकन, हगणदारीमुक्ती ओ. डी.एफ. आदी विषय मंजूर करण्यात आले.

तर माझ्या घरापासून अतिक्रमण हटवा -राजेश वानखेडे
नगरसेवक राजेश वानखेडे यांनी शहरातील अतिक्रमणाचा मुद्द्यावर जोर देत सभागृहाचे लक्ष वेधले. शहरातील अनेक घरे अतिक्रमणात आहेत ते सर्व अतिक्रमण काढावे, काही लोकांना पाठीशी का घातले जात आहे? असा प्रश्‍न उपस्थित करीत जर माझे अतिक्रमण असेल माझ्या घरापासून सुरुवात करावी, असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले.

सभागृहात यांची उपस्थिती
नगरसेवक राजेंद्र चौधरी, राजेश वानखेडे, राजेंद्र चौधरी, फिरोज खान, गटनेते अजय भारंबे, विश्वास चौधरी, मीनाक्षी कोल्हे, जयश्री नेहते, अल्लाहबक्ष शेख, किशोर बेंडाळे, रंजना भारंबे, सतीश बेंडाळे, नाजीरा बागवान, करूणा पाटील, लीना चौधरी, सिद्धार्थ बडगे, विजया जावळे उपस्थित होत्या.