सावद्यात केळी निर्यात झाली ठप्प

1

अपघातात मृत झालेल्या मजुराकडे केळी व्यापार्‍याने दुर्लक्ष केल्याने मजुरांचे ‘काम बंद’

सावदा- केळी मजूर प्रवीण कोळी यांचा केळीची गाडी भरून येत असताना अपघात झाल्यानंतर 14 रोजी मृत्यू झाला होता. मृत्यू झालेल्या तरुणाच्या कुटुंबीयांची नुकसानभरपाईची मागणी केल्यानंतरही संबंधी केळी व्यापार्‍याने पीडित कुटुंबाकडे दुर्लक्ष केल्याने सावदा पंचक्रोशीतील केळी मजदूरांनी एकत्र येत एक दिवस काम बंद ठेवल्याने केळी निर्यात ठप्प झाली. मजुरांनी यावेळी सावदा येथे विश्रामगृहावर एकत्र येत आपल्या मागण्या संयोजकांकडे मांडल्. जोपर्यंत संघटना कायदेशीररीरत्या तयार होत नाही तोपर्यंत सर्व मजुरांनी आपले काम चालू ठेवावे, असा निर्णय घेण्यात आला

सावद्याच्या इतिहासात पहिल्यांदा काम बंद
जळगाव जिल्हा हा केळीसाठी ओळखला जातो त्यात जळगाव जिल्ह्यातील सावदा शहर हे बनाना सिटी म्हणून ओळखले जाते. सावदा शहरातून दररोज शेकडो माल ट्रक पर राज्यासह परदेशात उच्च प्रतीची केळी निर्यात केली जाते. ऊन, पाऊस, थंडी या तिघा ऋतुंमध्ये सावदा शहरातून केळी निर्यात केली जाते. आजपर्यंत एकही दिवस केळी निर्यात थांबली नाही मात्र बुधवार, 20 रोजी एक दिवसासाठी केळी निर्यात थांबली.

विश्रामगृहाला यात्रेचे स्वरुप
सावदा येथे केळी निर्यात थांबल्यामुळे संपूर्ण केळी मजदूर हे विश्रामगृहावर जमल्याने विश्राम गृहाला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. एरवी विश्रामगृहावर कुणी राजकीय नेता येतो तेव्हाच गर्दी बघायला मिळते आज पहिल्यांदाच विना राजकीय नेत्यांची गर्दी पहायला मिळाली.

केळी मजदुरांची पुढील दिशा ठरविणार
विश्रामगृहावर केळी मजदूर यांना मार्गदर्शन करताना पुढील पंधरा दिवसात नोंदणीकृत युनियन स्थापन करून केळी मजुरांची दिशा ठरवण्यात येऊन केळी मजुरांच्या न्याय हक्कासाठी लढणार असल्याचे कोचुर येथील कमलाकर पाटील यांनी सांगितले तर आम्ही कुणाच्या विरोधात नसून केळी कामगार मजुर यांच्या न्याय हक्क अधिकारासाठी आमचा लढा असून आम्हाला केळी उत्पादक शेतकर्‍यांनी तसेच व्यापार्‍यांनी सहकार्य करावे, असे केळी मजदुर युनियनचे संयोजक पंकज पाटील म्हणाले.

यांची होती उपस्थिती
कोचूर येथून पंकज पाटील, कमलाकर पाटील, महेंद्र पाटील, सावदा येथून रमाकांत तायडे, पिंटू तायडे, शेख अज्जू शेख शकील, महेंद्र कोळी, विजय कोळी, बाळू कोळी, हितेश कोळी, प्रदीप कोळी, निलेश कोळी, गुड्डू कोळी, महेंद्र कोळी, राहुल कोळी, नितीन कोळी, जितु कोळी, गणेश फडतरे यांच्यासह सावदा पंचक्रोशीतील शेकडो केळी कामगार उपस्थित होते.