सावदा : शहरातील एकाच कुटूंबातील तिघांचा कोरोनामुळे तर अन्य एकाचा वार्धक्याने मृत्यू झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. शहरातील प्रतिष्ठीत अशा परदेशी कुटूंबातील सहा ते सात जणांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर जळगाव येथे उपचार सुरू होते. एलआयसी प्रतिनिधी असलेल्या संगीता किशोरसिंह परदेशी (48) यांचा जळगव येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना 22 रोजी सकाळी मृत्यू झाला तर त्याच दिवशी त्यांच्या सासूबाई कुवरबाई गणपतसिंह परदेशी (85) यांनी सावद्यातील घरी वृद्धापकाळाने अखेरचा श्वास घेतला. ही घटना ताजी असतानाच 24 रोजी एलआयसी प्रतिनिधी किशोर परदेशी (52) यांचा जळगावच्या खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला तर याच कुटूंबातील सदस्य तथा पत्रकार कैलाससिंह गणपतसिंह परदेशी (55) यांचेदेखील 25 रोजी मुक्ताईनगर ग्रामीण रुग्णालयात निधन झाले.
प्रशासनाने घेतली बैठक
या घटनेनंतर नगरपालिकेत प्रांताधिकारी कैलास कडलग व तहसीलदार उषाराणी देवगुणे यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकप्रतिनिधींची एक बैठक घेण्यात आली. यावेळी मुख्याधिकारी सौरभ जोशी यांनी शहरातील परीस्थिती व उपाय योजनांबाबत माहिती दिली तर तहसीलदार देवगुणे यांनी संपूर्ण लॉकडाउन (जनता कर्फ्यू) लावण्याऐवजी जनतेने नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले शिवाय सायंकाळी सात वाजेनंतर कडक संचारबंदी पाळा असे सांगितले. नगरसेवक राजेंद्र चौधरी व फिरोज खान पठान यांनी देखील विचार मंडताना शहरात जनतेत जनजागृतीबाबत सुचविले तसेच कोविड सेंटर शहरात असल्यास लोकांच्या मनातील भीती कमी होईल व लोक टेस्टिंगसाठी येतील, असेदेखील सुचविले. प्रांताधिकारी कैलास कडलग म्हणाले, ज्यांना त्रास होत आहे त्यांनी लवकर टेस्टिंग करावे जेणकरून तत्काळ उपचार होवून मृत्यूदर कमी होईल. यावेळी नगराध्यक्षा अनिता येवले, सहा.निरीक्षक देविदास इंगोले, मुख्याधिकारी सौरभ जोशी, नगरसेविका रंजना भारंबे, जयश्री नेहेते, लीना चौधरी, नंदाबाई लोखंडे, मीनाक्षी कोल्हे, शबाना तडवी, नगरसेवक राजेंद्र चौधरी, फिरोज खान पठाण, सतीष बेंडाळे, किशोर बेंडाळे, सावदा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी प्रसाद पाटील, शहरातील डॉक्टर, पत्रकार व मान्यवर उपस्थित होते.