सावद्यात दफनभूमीचा वाद पेटला : नगरपालिकेत आणला मृतदेह

0

130 वर्षानंतर पहिलाच पेचप्रचंग : पोलिस, लोकप्रतिनिधींच्या हस्तक्षेपामुळे सामंजस्याने निघाला तोडगा

सावदा- शहरातील येथील साळीवाडा भागातील रहिवासी रत्नाकर मुरलीधर कासार (वय 65) यांचे 10 सप्टेंबरला निधन झाले. त्यांच्या दफनविधीसाठी पिंपरुड मार्गावरील गट क्रमांक पाच मधील लहान मुलांच्या दफनविधीसाठी राखीव 10 गुंठे जागेतील एका भागात खड्डा खोदण्यात आला. मात्र, त्यास शहरातील दुसर्‍या एका समाजाने हरकत घेत खड्डा खोदणार्‍यांशी वाद घातले. ही माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. अनाहुतपणे झालेल्या या विरोधामुळे एका गटाने मृतदेह घेेऊन थेट पालिका गाठली. येथे शहरवासीयांनी समन्वयाची भूमिका घेतल्याने दुपारी 2 वाजता नियोजित ठिकाणी मृतदेह पुरण्यात आला.

शहरातील दुकाने बंद : मृतदेत आणला पालिकेत
शासनाने सन 2001 मध्ये पिंपरुड मार्गावरील गट क्रमांक 5 मधील 10 गुंठे जागा हिंदुच्या लहान मुलांच्या दफनभूमीसाठी दिली आहे. सातबार्‍यावर तशी नोंद आहे. या जागेत रत्नाकर साळी यांच्या दफनविधीसाठी सकाळी 8.30 वाजता खड्डा खोदणे सुरू होते. दुसर्‍या एका समुदायाने सकाळी 11.15 वाजता यास विरोध केल्याने तणाव वाढला. ही वार्ता पसरताच शहरातील दुकाने पटापट बंद झाली. यामुळे सहायक पोलिस निरीक्षक राहुल वाघ सहकार्‍यांसह घटनास्थळी आले. दरम्यान, अंत्यसंस्काराची तयारी पूर्ण झाल्याने कासार यांचा मृतदेह घेऊन कुटुंबीय व नातेवाईक दुपारी 12.30 वाजता दफनभूमीकडे निघाले. मात्र, समोर उद्भवलेल्या वादामुळे त्यांनी एक वाजता मृतदेह थेट पालिकेत आणला. जोपर्यंत नियोजित ठिकाणी दफनविधी होत नाही, तोपर्यंत मृतदेह पालिकेतून उचलणार नाही, असा पवित्रा डॉ.चंद्रशेखर पाटील, शरद भारंबे, कालिदास ठाकूर, जे.के.भारंबे आदींनी घेतला. मात्र, राजेंद्र चौधरी, राजेश वानखेडे यांनी हा वाद कायद्याच्या चौकटीत बसवून सामोपचाराने सोडवण्याची सूचना केली. एपीआय राहुल वाघ यांनी घटनास्थळी दोन्ही गटाची चर्चा करून गट क्रमांक 5 मधील नियोजित जागेवर मृतदेहाच्या दफनविधीचा मार्ग मोकळा केला.

बैठक घेणार
महसूल, पालिकेसह 15 दिवसांत दोन्ही समुदायाची बैठक घेऊ. दफनविधी नवीन जागेच्या मागणीबाबत चर्चा होईल, असे एपीआय राहुल वाघ यांनी दोन्ही गटांना सांगितले.

पोलिस बंदोबस्त वाढवला
सुरेशशास्त्री मानेकर, अजय भारंबे, कालिदास ठाकूर, विश्वास चौधरी, जे.के.भारंबे, अभियंता धनराज राणे, वरिष्ठ लिपिक अनिल आहुजा यांंची पालिकेत उपस्थिती होती. डीवायएसपी सुभाष नेवे यांचेसह पोलिस बंदोबस्तात दुपारी 2 वाजता दफनविधी करण्यात आला.

130 वर्षांत पहिलाच पेचप्रसंग
पालिकेच्या 130 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असा पेचप्रंसग निर्माण झाला. 11 सप्टेंबरच्या सर्वसाधारण सभेत याचे पडसाद उमटू शकतात.