भावी नवरदेवासह चुलत भावाचा नशिराबादजवळ झाला होता मृत्यू
भुसावळ- सावद्याकडे दुचाकीने निघालेल्या दोघा चुलतभावांच्या वाहनाला भरधाव ट्रकने धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना नशिराबादजवळील ओरीएंट फॅक्टरीजवळ शनिवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास घडली होती. रविवारी सकाळी 11 वाजता पोस्टाजवळील शिवाजी चौक भागातून एकाचवेळी दोघा चुलत भावांची अंत्ययात्रा निघाल्याने उपस्थितांनाही अश्रू आवरणे कठीण झाले. हेमंत उर्फ आकाश जीवन भिरूड (27) व त्याचा चुलत भाऊ वैभव विजय भिरूड (20, दोघेही रा.सावदा) या दोघा भावांचा शनिवारी सायंकाळी नशिराबादजवळील ओरींएट फॅक्टरीजवळ मृत्यू झाला होता. दरम्यान, अपघातग्रस्त दुचाकी व ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतला असून ट्रक चालक पसार अद्यापही पसार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
लग्नापूर्वीच मृत्यूने गाठले
सावद्यातील रहिवासी व मध्य रेल्वेत नोकरीस असलेल्या हेमंत उर्फ आकाश भिरूडचा नुकताच साखरपुडा तपतकठोरा येथे झाला होता तर पुढच्या महिन्यात 20 एप्रिल रोजी त्याचा विवाह सावद्यात होणार होता. लग्नासाठी घरात लगबग सुरू असतानाच दोघे चुलत भाऊ लग्नाचा सामान खरेदीसाठी दुचाकी (एम.एच.19 बी.टी. 2001) ने जळगाव येथे गेले होते. परतीच्या प्रवासात नशिराबादजवळील ओरीएंट फॅक्टरीजवळ भरधाव ट्रक (एम.एच.19 जे.वाय.1931) ने धडक दिल्याने दोघे भाऊ जागीच ठार झाले. मयत हेमंत हा व्यापारी जीवन भिरूड यांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या पश्चात वडील, आई, आजोबा, आजी, बहीण असा परीवार आहे तर वैभव हा जीवन भिरूड यांचे लहान भाऊ विजय उर्फ दत्तू भिरुड (रा.वापी) यांचा मुलगा होय. अपघातास कारणीभूत असलेला ट्रक नशिराबाद पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.