सावद्यात पतसंस्थांसह नऊ व्यापारी गाळ्यांना सील

पालिकेच्या कारवाईने थकबाकीदारांच्या गोटात खळबळ : कर वसुलीसाठी आता ढोल वाजवून होणार वसुली !

सावदा : मार्च एण्ड आल्यानंतर सावदा पालिकेने थकबाकीदारांविरोधात मोहिम उघडून धडक कारवाईला सुरुवात केली आहे. 2021-22 या आर्थिक वर्षात अडीच कोटी रुपयांची थकबाकी वसुल करण्याचे आवाहन पालिकेपुढे असून बुधवारी तीन पतसंस्थांच्या कार्यालयांसह नऊ व्यापारी गाळे सील करण्यात आल्यानंतर थकबाकीदारांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.

या थकबाकीदारांवर झाली कारवाई
बुधवारी संभाजी चौक परीसरातील सावदा मर्चंट को-ऑप.सोसायटी, दुर्गामाता चौक परीसरातील लोकसेवा पतसंस्था, महावीर चौक परीसरातील तापी पतसंस्था तसेच दुर्गा माता रोडवरील राणे-भंडारी शॉपिंग कॉम्प्लेक्समधील गाळे क्रमांक 7, 9, 10, 11, 14, 15, 18, 19 व 22 क्रमांकाचे गाळे थकबाकी न भरल्याने सील करण्यात आले.

आता ढोल वाजवून होणार वसुली
मालमत्ताकर व पाणी पट्टी कर वसुलीसाठी आता ढोल वाजवून वसुली करण्यात येणार आहे. शहरातील प्रत्येक भागांमध्ये लाऊड स्पीकरद्वारे नागरीकांना आपल्या करांच्या रकमा वेळेत भरा, अन्यथा मालमत्ता जप्तीची कारवाई होईल, असा निर्वाणीचा इशारा देण्यात आला असल्याचे मुख्याधिकारी किशोर चव्हाण म्हणाले.

अडीच कोटींची थकबाकी
थकीत कराची रक्कम वसुल करण्यासाठी तब्बल पाच विभाग (डिमांड) असून त्याअंतर्गत सहा पथकांची स्थापना करण्यात आली आहे. शहराचा परीघ किमान 3.61 किलोमीटरचा असून मालमत्ता कराचे व पाणीपट्टी कराचे अनुक्रमे सात हजार चार हजार करदाते आहेत. प्रत्येक घरात जाऊन कर मागणी पत्रक देणे, वसुली करणे यासाठी पथकाच्या माध्यमातून व्यवस्थापन करण्यात आली आहे तर कारवाई करणार्‍या पथकात कार्यालय अधीक्षक सचिन चोळके, कर निरीक्षक अनिल कुमार आहुजा, लिपिक विश्वास साळी,लिपिक संजय माळी,शिवाजी भंगाळे, महेश इंगळे आदींचा समावेश आहे.

थकबाकी भरून सहकार्याचे आवाहन
जानेवारी महिन्यापासून वसुलीची कारवाई जोरात सुरु असून जे व्यापारी व थकबाकीदार आपली थकबाकी त्वरीत भरत नसतील त्यांची मालमत्ता सील करण्यात येणार आहे. गाळे सील करूनही थकबाकी न भरल्यास संबधीत दुकाने, गाळे, संस्था, मालमत्ता या पालिका प्रशासन ताब्यात घेवून त्या नाममात्र दराने नगर पालिकेच्या नावे करण्यात येणार असून तातडीने कराचा भरणा करून कटू कारवाई टाळावी, असे आवाहन मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी नागरीकांना केले आहे.