सावदा- पालिका हद्दीतील गट क्रमांक 689 मधील प्लांट क्र. 3 मध्ये केर्हाळा येथील कविता महेंद्र पाटील यांना दोन मजली इमारत बांधकामाची परवानगी मिळाली आहे. मात्र त्यांनी नियम डावलून अनधिकृत बांधकाम केले. हे बांधकाम काढून टाकावे, यासाठी पालिकेने सहा वेळा नोटीस दिली. तरीही प्रतिसाद न मिळाल्याने पालिकेने त्यांच्याविरुद्ध मंगळवारी थेट गुन्हा दाखल करण्यात आल्याने अतिक्रमितांमध्ये खळबळ उडाली आहे. कविता पाटील यांनी संबंधित जागेवर मंजूर नकाशापेक्षा जास्तीचे बांधकाम केले होते. हे अनधिकृत बांधकाम काढून घ्यावे यासाठी सावदा पालिकेने त्यांना सूचना केली होती. त्यासाठी सहा वेळा नोटीसही दिली होती. मात्र, त्यांनी अनधिकृत बांधकाम काढले नाही. याप्रकरणी पालिका अधिनियम, महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1966 चे कलम 52, 53 या नियमांचे उल्लंघन झाल्याने पालिकेचे कनिष्ठ अभियंता डी.एस.राणे यांनी सावदा पोलिस ठाण्यात तक्रारी दिली. यानुसार मंगळवारी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहायक पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांचे मार्गदर्शनाखाली रवींद्र मोरे करत आहे.