सावद्यात मुसळधार पावसाने घर कोसळले

सुदैवाने कुटुंब घरात नसल्याने जीवीतहानी टळली : 66 हजारांचे नुकसान झाल्याचा तलाठ्यांकडून पंचनामा

सावदा : मुसळधार पाऊस सुरू असताना गावातील शेखपुरा भागात शहीद अब्दुल हमीद स्मारकासमोरील सलीम खान मुस्तफाखान उर्फ भुर्‍या यांचे घर कोसळल्याची घटना नुकतीच कोसळली. सुदैवाने घरात कुणीही नसल्याने जीवीतहानी टळली तर या घटनेत 66 हजारांचे नुकसान झाले. प्रशासनाने या कुटूंबाला तातडीने भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून भुसावळ शहर व विभागात संततधार कायम असून जनजीवनावर मोठा परीणाम झाला आहे.

कुटुंब बाहेरगावी गेल्याने बचावले
सलीम खान मुस्तफाखान हे रविवार, 26 सप्टेंबर रोजी त्यांची पत्नी व तीन मुलांना सोबत घेऊन बुहाणपूर नातेवाईकांकडे गेल्याने सुदैवाने घर कोसळताना अप्रिय घटना टळली. या घटनेमुळे मात्र घरातील सामानाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. घर कोसळल्याची माहिती मिळताच रात्रीच राष्ट्रवादीचे विरोधी गटनेते व नगरसेवक फिरोज खान पठाण व सावदा पोलिस ठाण्याचे सहा.निरीक्षक देविदास इंगोले यांनी दाखल होत पाहणी केली. मंगळवारी दुपारी कोसळलेल्या घराची चौकशी व पाहणी सावदा तलाठी शरद पाटील यांनी केली व 66 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा पंचनामा करण्यात आला. यावेळी शहिद अब्दुल हमीद स्मारकचे अध्यक्ष शेख मुख्तार, सलीम खान उर्फ भुर्‍या व त्याचे वडील मुस्तफा खान हे उपस्थित होते.