रिझर्व्ह बँकेच्या आदेशाला ‘खो’ ; कॉईन न स्वीकारण्याचा लावला फलक
फैजपूर:- सावदा-फैजपूर रस्त्यावरील रिलायन्स पेट्रोल पंप चालकाने कॉईन न स्वीकारण्याचा फलक लावल्याने ग्राहकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. रिझर्व्ह बँकेने वास्तविक कॉईन न स्वीकारणार्यांवर तक्रार करण्याचे आवाहन केले असताना दुसरीकडे पंप चालकाने नियमच धाब्यावर बसवल्याने आश्चर्य व्यक्त हात आहे. पेट्रोलचा दर हा पैशांमध्ये अर्थात 80 रूपये 40 पैसे किंवा 82 रूपये 87 पैसे असा असतो व दुसरी कडे 10 रुपयांचे नाणे नाकारणार्यावर आरबीआयने कारवाईचे आदेश दिले असतांना सावदा येथील रिलायन्स पेट्रोल पंपावर थेट कॉइन स्विकारले जाणार नाही, असा फलक लावल्याने टिकेचे धनी ठरले आहेत. या प्रकारामुळे ग्राहकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे. ज्या ग्राहकाला एक लिटर पेट्रोल टाकायचे असेल तर त्याला पूर्ण शंभर रुपयाचे पेट्रोल टाकावे लागते यामुळे पेट्रोल पंप चालकांना याचा चांगलाच फायदा होत आहे.
बँक अधिकार्यांची बेफिकिरी
याबाबत फैजपूर शाखा व्यवस्थापाक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, आरबीआयशी संबंधित सावदा शाखा आहे त्यामुळे त्यांच्याशी संपर्क साधावा, अशी उडवा-उडवीची उत्तरे देण्यात आली. मुजोर पेट्रोल पंप चालकांवर कारवाई कधी होणार? असा प्रश्न सामान्य जनतेला मनात पडला आहे. याबाबत सावदा स्टेट बँकेत संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही
बँकच घेत नाही नाणे -पंपचालक
भारतीय स्टेट बँक आमच्याकडून 10 चे अथवा कोणतेच नाणे घेत नाही. आम्ही ग्राहकांकडून नाणे घेण्यास तयार आहोत पण सावदा स्टेट बँकेने आमचे नाणे स्वीकारावे. दररोज तीन ते चार हजारांचे नाणे येतात. जर बँक नाणे घेत नसेल तर आम्ही नाणे कुठे द्यावे? स्टेट बँकेने आम्हाला दररोज पाचशे रुपये स्वीकारेल, असे सांगितले आहे ते पण फक्त दहाची नाणी घेणार असल्याचे सांगितले असल्याचे रिलायन्स पेट्रोल चालक मनीष माहुरकर म्हणाले.