सावदा : सावद्यासह परीसरात शनिवार, 20 रोजी सायंकाळीसात वाजेदरम्यान झालेल्या वादळी वार्याने शहरातील क्रांती चौक भागात अंगावर झाडाची फांदी पडल्याने मेसचालक तरुण जखमी झाल्यानंत उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. शनिवारी सायंकाळी अवकाळी वादळी वारा व रीमझिम पाऊस सुरू झाला मात्र थोड्याचवेळातच वादळाने उग्र रूप धारण केल्याने शहरात अनेक ठिकणी पत्रे उडाली व गुरांच्या गोठ्याचे नुकसान झाले व वीजपुरवठादेखील खंडीत झाला याच दरम्यान क्रांती चौकात मेस चालविणारे चेतन सुभाष पाटील (39) हे त्यांच्या घरापासून थोड्या अंतरावर असतांना तेथे असलेल्या पिंपळाच्या झाडाची एक मोठी फांदी वार्याच्या वेगाने चेतन पाटील यांच्या अंगावर पडली यात ते गंभीर जखमी झाले. भुसावळ येथे उपचार सुरु असतांना रात्री त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
शासनाकडून मदतीची अपेक्षा
चेतन पाटील हे शहरात मेसचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. 21 रोजी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी व चिमुकली मुलगी असा परीवार आहे. शासनातर्फे त्यांना त्वरीत मदत देण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. आमदार चंद्रकांत पाटील, प्रांताधिकारी कैलास कडलग, तहसीलदार उषाराणी देवगुणे, नगरसेवक फिरोजखान पठाण आदींनी भेट दिली.
पंचनाम्यांसह भरपाईची अपेक्षा
वादळाने सावदा, चिनावल, आंदलवाडी आदी परीसरात केळी बागांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे तर काही ठिकाणी वृक्षदेखील पडल्याच्या घटना घडल्या आहेत. या शेतकर्यांना नुकसान भरभाई मिळण्याची अपेक्षा असून आमदार चंद्रकांत पाटील यांनी सावदा येथे रेस्ट हाऊस येथे झालेल्या बैठकीत अधिकार्यांशी चर्चा केली.