सावद्यात विकासकामांना नाहरकत देण्यास टाळाटाळ

नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्या रीकाम्या खुर्चीला शिवसेनेकडून बेशर्मीचा हार घालून निवेदन सादर

सावदा : सावदा शहरात आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पाठपुराव्याने सुमारे दोन कोटी रुपयांची विकासकामे मंजूर करण्यात आली आहेत मात्र या कामांसाठी सावदा नगरपालिकेकडून नाहरकत प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ होत असल्याने सोमवारी सावदा शहर शिवसेना पदाधिकार्‍यांनी आक्रमक पवित्रा घेत नगराध्यक्ष व मुख्याधिकारी उपस्थित नसल्याने काही वेळ ठिय्या आंदोलन करीत दोघा पदाधिकार्‍यांच्या रीकाम्या खुर्चीस बेशर्मीचा फुलांचा हार घालत निवेदन दिले. सावदा शहरासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांनी पाण्याच्या टाकीसाठी 75 लाख रुपये, शहरवासीयांचे श्रद्धास्थान असलेल्या खंडेराव महाराज मंदिराच्या विकासासाठी 60 लाख रुपये, सोमेश्वरनगर मधील नवीन वस्तीचे रस्त्यांसाठी 30 लाख रुपये तसेच शहरातील मुस्लिम बांधवांच्या कम्युनिटी हॉलसाठी निधी अश्याप्रकारे सुमारे दोन कोटी रुपयांचा निधी विकासकामांसाठी मंजूर केला असतांना या कामासाठी नाहरकत दाखला पालिका देत नसल्याने शहर विकासात आडकाठी आणत असल्याचा आरोप करीत 1 रोजी सावदा शहर शिवसेनेच्या वतीने नगरपालिकेत निवेदन सादर करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष तसेच मुख्याधिकारी हे दोन्ही महत्वाचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित नसल्याने शिवसेना कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेले दिसले. यावेळी त्यांनी नगराध्यक्ष व मुख्याधिकारी दालनासमोर ठिय्या आंदोलन केले व त्यांचे रीकाम्या खुर्च्यांना बेशर्मीचा हार घालून रीकाम्या खुर्च्यांना निवेदन सादर करण्यात आले. शिवसेनेच्या अनोख्या आंदोलनाची सर्वत्र चर्चा होत आहे.

यांची होती उपस्थिती
यावेळी उपतालुका प्रमुख धनंजय (लाला) चौधरी, विधानसभा क्षेत्रप्रमुख मिलिंद पाटील, शहरप्रमुख सुरज (बद्री) परदेशी व भरत नेहते, शहर संघटक शरद भारंबे व निलेश खाचणे, युवा सेना शहरप्रमुख मनीष भांगाळे, गजानन ठोसर यांच्यासह शिवसेना-कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. या निवेदनात विकासकामांमध्ये आडकाठी आणल्यास शिवसेनेकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल व यास सर्वस्वी जबाबदार नगरपालिका सत्ताधारी व मुख्याधिकारी असतील, असे नमूद करण्यात आले आहे. दरम्यान यावेळी प्रशासनाचे वतीने कार्यालय प्रमुख सचिन चोळके यांनी हे निवेदन स्वीकारले.