सावदा : नागरीकांच्या सोयीसाठी शहरात शादीखाना कम्युनिटी हॉल बांधण्यासंदर्भात राष्ट्रवादीचे विरोधी गटनेते फिरोज खान पठाण व नगरसेवकांनी आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे मागणी केली होती. शादीखाना हॉलसंदर्भात शासनाकडून निधी मंजूर झाला असून शादीखाना हॉल उभारणीसाठी ना हरकत दाखला व देखरेख संदर्भात सर्वसाधारण सभेत हा विषय घेण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे विरोधी गटनेते यांनी नगराध्यक्षा अनिता येवले तसेच मुख्याधिकारी सौरभ जोशी यांच्याकडे केली होती मात्र त्यांच्याकडून टाळाटाळ करण्यात आल्याचा आरोप होत आहे.
यांची निवेदनावर स्वाक्षरी
शहरात शादीखाना हॉलला मान्यता मिळाली असून हॉलचा संपूर्ण खर्च शासन करणार असून पालिकेला कोणताही खर्च नवीन हॉलसाठी करावा लागणार नाही केवळ देखरेख संदर्भात ठराव करून पुढील होणार्या सभेमध्ये ना हरकत प्रमाणपत्र देऊन मान्यता मिळावी तसेच शादीखाना हाल बांधकामाबद्दल कलम 81 प्रमाणे विशेष सभेमध्ये हा विषय घेऊन ठराव करण्यात यावा, अशी मागणी नगराध्यक्षा व मुख्याधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. या निवेदनावर नगरसेवक राजेश वानखेडे, विरोधी गटनेते फिरोज खान पठाण, अपक्ष नगरसेवक राजेंद्र चौधरी, सिद्धार्थ बडगे, नगरसेविका मीनाक्षी कोल्हे, विजया कुशल जावळे, नाजरा बी.ईस्त्याक बेंडाळे, अपक्ष नगरसेवक अल्लाबक्ष व नगरसेविका नंदाबाई लोखंडे यांनी केली आहे.
टाळाटाळ करणे आरोप चुकीचा : मुख्याधिकारी
नाहरकत देण्यास प्रशासनाकडून कोणतीही टाळाटाळ होत असल्याचा प्रश्नच नाही. शासनाकडून सदर काम मंजूर होत असताना ते काम नेमक्या कोणत्या जागेवर करावे हा उल्लेख नाही. ती जागा सुचविण्याचे काम नगरपालिका सर्वसाधारण सभा करू शकते कारण त्या जागेची मालकी नगरपालिकेची असते. मी मुख्याधिकारी म्हणून जागा सुचवू शकत नाही. संपूर्ण विषय समजून न घेता मुख्याधिकारी नाहरकत देण्यास टाळाटाळ करतात असे म्हणणे संपूर्णपणे चुकीचे असल्याचे मुख्याधिकारी सौरभ जोशी म्हणाले.