सावद्यात शेळ्या चोरट्यांचा पाठलाग करताना कार कोसळली गटारीत : दोघे चोरटे मात्र पसार

सावदा : सावदा शहरातील आठवडे बाजार परीसरातून शेळ्या चोरीच्या संशयानंतर पलायन करणार्‍या कारचा पाठलाग करताना वाहन अनियंत्रीत होवून थेट गटार पार करून पातळगंगा नदीपात्रात जाऊन थांबली. या वाहनात चालकासह एक जण होता परंतु मारहाण होण्याच्या भीतीने त्यांनी पळ काढला. चारचाकी (एम.एच.02 ए.वाय.5129) ताब्यात घेण्यात आली असून या प्रकरणी गुन्हा दाखल झाला नसल्याचे सांगण्यात आले.

वाहनातून शेळ्या चोरीचा आरोप
सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबई पासिंगच्या कारमधील संशयीत आठवडे बाजार परीसरात शेळ्या चोरीचा प्रयत्न करीत होते व एका दुचाकीस्वाराने हा प्रकार पाहिल्यानंतर कारचा आठवडे बाजार परीसरात पाठलाग केला. यावेळी कारचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार गटार ओलांडून पाताळगंगा नदीपात्रात जाऊन थांबली. कारचे मागील चाक पंक्चर झाले तर कारच्या समोरील बाजूचे नुकसान झाले. याचवेळी वाहनाचा पाठलाग करणारा दुचाकीस्वारही गटारात वाहनासह पडला. त्याला सुखरूप बाहेर काढण्यात आले. या वाहनात प्लास्टिक पिशवीत मका बियाणे आणि वनस्पतीची पाने होती. त्यातील व्यक्ती शेळ्या ज्या ठिकाणी उभ्या असतात, त्या ठिकाणी कार थांबवून शेळ्यांना खाण्याचे आमिष दाखवून त्या जवळ आल्या की त्यांना गुपचूप वाहनात ओढून घेत होते, असे काही प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.

पोलिसांनी मोबाईल केला जप्त
संशयीत पळण्याच्या तयारीत असताना हा अपघात घडला. ही कार ज्यावेळी थांबली, त्यावेळी वाहनाचा दरवाजा उघडताच त्यातील दोन ते तीन शेळ्या बाहेर उड्या मारून मोकाट सुटल्या. संबंधित कार वाशी (नवी मुंबई) येथील आरटीओकडे एका महिलेच्या नावावर रजिस्टर असल्याचे सांगण्यात आले. सावद्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक डी.डी.इंगोले यांच्या मार्गदर्शनखाली पोलिस देवा पाटील, उमेश पाटील आदींनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून माहिती घेतली. या प्रकरणी सावदा पोलिस ठाण्यात अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे सांगण्यात आले. घटनास्थळी एक मोबाईल सापडल्याचे समजते.